
नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्टय़ांमुळे देशभरातील हजारो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. सकाळपासूनच साईमंदिराच्या दर्शनरांगा भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानंतर साईमंदिर प्रशासनाने मंदिराच्या दर्शनवेळेत बदल केला आहे. पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भाविकांना प्रवेश दिला जाणार नसून, सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच भाविकांना साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे.
सध्या ‘ओमायक्रोन’चा धोका लक्षात घेता, राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे रात्री 9 वाजेनंतर श्री साईबाबांचे समाधीमंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. रात्री 10.30 वाजताची ‘श्रीं’ची शेजारती व पहाटेची 4.30 वाजताची काकड आरती नियमित होणार असून, याकरिता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. तर, संस्थानचे श्री साई प्रसादालय, लाडू विक्री काऊंटर, कॅण्टीन आदी सुविधाही नऊ वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
साईमंदिराजवळ बेवारस बॅग
दुपारी साईमंदिराजवळ बेवारस बॅग आढळून आली होती. साईमंदिराच्या दोन नंबर गेटजवळ ही बॅग आढळल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने बॅगची तपासणी केली. मात्र, यात आक्षेपार्ह काही सापडले नाही. या बॅगमध्ये कपडे आणि औषधांच्या बाटल्या असल्याचे समोर आले आहे. एखादा साईभक्त बॅग विसरला असण्याची शक्यता असून, जास्त वेळ बॅग पडून असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव बॅगची तपासणी करण्यात आली.
पंढरपूरचे विठ्ठल मंदिरही 9 वाजेपर्यंतच खुले राहणार
‘ओमायक्रोन’ची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने देवाचे दर्शन रात्री 9 वाजेपर्यंतच खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रविवारी रात्रीपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याबरोबर चर्चा करून हा निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत देवाचे मुखदर्शन सुरू ठेवले जात होते. आता दर्शनाची वेळ एक तास कमी करण्यात आली आहे; परंतु 9 वाजता दर्शन बंद केले जाणार असल्याने त्यापूर्वी अर्धा तास आधीच म्हणजे रात्री साडेआठ वाजताच भाविकांना दर्शनरांगेत प्रवेश दिला जाणार नाही. तर, सकाळी सहा वाजता पूर्वीप्रमाणेच दर्शन सुरू होणार आहे.

























































