सॅमसनच्या बदल्यात जाडेजा द्या! राजस्थान रॉयल्सचा बदली प्रस्ताव चेन्नई सुपर किंग्जने फेटाळला

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आपला हा संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बदली प्रस्तावानुसार राजस्थानने चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड किंवा शिवम दुबे यापैकी एक क्रिकेटपटू देण्याची मागणी केली होती. मात्र, चेन्नईने हा प्रस्ताव फेटाळला आहे. राजस्थान सॅमसनसारख्या महत्त्वाच्या खेळाडूला रिलीज करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. खेळाडूंना रिटेन, रिलीज किंवा ट्रेड करण्याचा अंतिम अधिकार हा फ्रँचायझीकडे असल्याने सध्या तरी सॅमसनच्या हातात काहीच नाहीये.

मागील लिलावाआधी इंग्लंडच्या जोस बटलरला रिलीज केल्याने संजू सॅमसन नाराज होता. त्यामुळेच सॅमसनने या आयपीएल संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. चेन्नईसोबत डील फिस्कटल्यानंतर राजस्थान संघाने इतर संघांशी ट्रेडच्या शक्यता तपासण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स सुद्धा सॅमसनला घेण्यात स्वारस्य दाखवत आहेत.

राजस्थान संघाचे मालक मनोज बडले स्वतः सॅमसनच्या ट्रेड डीलवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी सर्व फ्रेंचायझींना याबाबत अधिकृत पत्र पाठवले असून, त्यात सॅमसनच्या बदल्यात खेळाडूंची मागणी नमूद केली आहे. त्यानुसार सीएसकेकडे जाडेजा, गायकवाड किंवा दुबेची मागणी करण्यात आली होती. मात्र, चेन्नईने या डीलला नकार दिला. चेन्नईने सॅमसनला पैशांच्या मोबदल्यात खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला, पण राजस्थानने तो मान्य केला नाही. जर ट्रेड जमून आला नाही, तर चेन्नई लिलावात सॅमसनला घेण्यासाठी पूर्ण ताकद लावेल.

लिलावात जाण्याची शक्यता कमी

चेन्नईचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर राजस्थानने इतर संघांशी बोलणी सुरू केली. अनेक संघ सॅमसनला आपल्या संघात घ्यायला इच्छुक आहेत. जर राजस्थानला चांगली डील मिळाली, तर सॅमसन लिलावाआधीच दुसऱ्या संघात दाखल होईल आणि लिलावात त्याचे नाव येणार नाही. मात्र, जर डील फिस्कटली, तर राजस्थान त्याला रिटेन करू शकते. खेळाडूला रिटेन, रिलीज किंवा ट्रेड करण्याचा अंतिम अधिकार फ्रेंचायझीकडे असल्याने यात खेळाडू फारसे काही करू शकत नाही. त्यामुळे सॅमसनला आणखी वाट बघावी लागणार आहे.

सॅमसनने अधिकृत रिलीजची मागणी केली

सॅमसनने राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाकडे स्वतःला रिलीज करण्याची अधिकृत विनंती केली आहे. बटलरच्या रिलीजवरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. २०२५च्या मेगा लिलावाआधी राजस्थानने बटलरला रिलीज केले होते. त्यानंतर बटलरला गुजरात टायटन्सने तब्बल १५.७५ कोटी रुपयांच्या मोबदल्यात विकत घेतले. बटलर गेल्यानंतर राजस्थानची फलंदाजी कमजोर झाली आणि मागील हंगामात संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकला नाही.