छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाला तीन महिने लागणार, मध्य रेल्वेवरील 15 डबा लोकल फेऱ्यांची वाढ ‘स्लो ट्रकवर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेवर 15 डबा लोकल फेऱयांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रकल्प रेंगाळला आहे. रेल्वे प्रशासनाने डिसेंबर 2025 मध्ये 34 स्थानकांतील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) व इतर 8 स्थानकांतील प्लॅटफॉर्म विस्तारीकरण अद्याप अर्धवट आहे. सीएसएमटीतील दोन प्लॅटफॉर्मच्या विस्ताराला आणखी किमान दोन-तीन महिने लागतील. त्यामुळे तूर्तास प्रवाशांना ‘पीक अवर्स’च्या गर्दीपासून दिलासा मिळण्याची शक्यता धूसर आहे.

मध्य रेल्वे मार्गावर 15 डबा लोकलच्या फेऱया वाढवून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. संपूर्ण मार्गिकेवरील 34 स्थानकांतील प्लॅटफॉर्म विस्तारीकरण टप्प्याटप्प्याने हाती घेतले जात आहे. सध्या सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्र. 7 वरूनच 15 डबा लोकलची सेवा सुरू असून दिवसभरात 22 फेऱया चालवण्यात येतात.

या फेऱयांची संख्या दुप्पट करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म क्र. 5 आणि 6 चा विस्तार गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असल्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण रखडले आहे. सध्या प्रस्तावित कामातील विविध गोष्टींचे अडथळे दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीएसएमटी हे उपनगरी रेल्वे आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीचे प्रमुख स्थानक असल्यामुळे येथील काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण पूर्ण होण्यास आणखी किमान दोन-तीन महिने लागतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. 34 पैकी 25 स्थानकांतील प्लॅटफॉर्मचा विस्तार केला असून सीएसएमटी, टिटवाळा आणि खडवली येथील कामाची चिंता असल्याचे संबंधित अधिकाऱयाने स्पष्ट केले.

गेल्या वर्षी जून महिन्यात मुंब्रा स्थानकाजवळ लोकलच्या गर्दीने
5 प्रवाशांचा बळी घेतला होता. त्या अपघातानंतर गर्दी नियंत्रणासाठी पावले उचलताना मध्य रेल्वेने 15 डबा लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी 34 स्थानकांतील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचा प्रकल्प जाहीर केला होता. धीम्या ट्रकवरही 15 डबा लोकलच्या फेऱ्या चालवण्याच्या दृष्टीने प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम हाती घेतले होते. विविध कारणांमुळे 9 स्थानकांतील कामाची रखडपट्टी झाली आहे.