तांत्रिक बिघाडामुळे सीएसएमटी स्थानकात पसरला अंधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाला वीजपुरवठा करणाऱ्या रेल्वेच्या सब स्टेशनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने या स्थानकात काही काळ अंधार पसरल्याची घटना रविवारी घडली. याप्रसंगी आपतकालीन वीजपुरवठ्याचा वापर करून स्थानकातील 40 टक्के वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. साधारण अर्ध्या तासानंतर संपूर्ण वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले.

सीएसएमटी स्थानकातील वीज अचानक गेल्यामुळे रविवारी पावणे आठच्या सुमारास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सीएसएमटीतील दिवे, लोकलचे व मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचे इंडिकेटर, नियंत्रण कक्ष अशा सर्वच ठिकाणांची वीज गेल्याने स्थानकात संपूर्ण अंधार पसरला.

वीज पुरविणाऱ्या सबस्टेशनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. त्यानंतर आपत्कालीन वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याने काही मिनिटांत स्थानकातील काही दिवे, लोकल आणि मेल-एक्स्प्रेसचे इंडिकेटर, नियंत्रण कक्ष, मोटरमन-गार्ड लॉबीतील वीज उपकरणे असा 40 टक्के वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले.