
क्युबातील वीज संकट अधिक गडद झाले असून शनिवारी संपूर्ण देशाची वीज प्रणाली पुन्हा एकदा कोलमडली. या भीषण संकटामुळे देशातील अंदाजे 11 दशलक्ष नागरिक अंधारात बुडाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मार्च महिन्यात संपूर्ण देश वीजविना राहण्याची ही तिसरी वेळ असून, क्युबन इलेक्ट्रिक युनियनने (UNE) या देशव्यापी ‘ब्लॅकआउट’ची अधिकृत घोषणा केली आहे. एकाच महिन्यात तिसऱ्यांदा अशा प्रकारे संपूर्ण देश अंधारात बुडाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या संकटाची सुरुवात कॅमागुए प्रांतातील नुएविटास औष्णिक विद्युत प्रकल्पातील एका जनरेटिंग युनिटमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे झाली. ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या एका बिघाडामुळे संपूर्ण ग्रीडवर परिणाम झाला आणि पाठोपाठ उर्वरित यंत्रसामग्रीमध्येही बिघाड होत गेल्याने अखेर संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली. सध्या रुग्णालये, पाणीपुरवठा केंद्रे आणि आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यासाठी छोटे मायक्रो-आयर्लंड जनरेटर वापरले जात आहेत.
क्युबाचे अध्यक्ष मिगुएल डियाझ-कॅनेल यांनी या परिस्थितीसाठी इंधनाचा तुटवडा आणि जुनी झालेली पायाभूत सुविधा जबाबदार असल्याचे म्हटले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून परदेशी पुरवठादारांकडून तेल उपलब्ध झालेले नाही आणि क्युबा आपल्या गरजेपैकी केवळ 40 टक्के इंधनाचे उत्पादन करतो. तसेच, अमेरिकेने लादलेले कडक निर्बंध आणि व्हेनेझुएलातून होणारा तेलपुरवठा बंद झाल्यामुळे हे संकट ओढवले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबाला तेल पुरवणाऱ्या देशांवर शुल्क लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी क्युबाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना हे सरकार कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले असून, भविष्यात क्युबाचा ताबा घेण्याचे संकेतही दिले आहेत.
या वीज संकटामुळे क्युबातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दररोज 12 तासांपर्यंत वीज कापली जात असल्याने लोकांचे कामाचे तास कमी झाले असून अन्न साठवणे आणि स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. अनेक रुग्णालयांना महत्त्वाच्या शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या आहेत. वीज नसल्यामुळे पाणी उपसा करण्यावरही परिणाम झाला असून अनेक शहरांमध्ये नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या अस्थिरतेने क्युबाच्या अर्थव्यवस्थेवर आणि राजकीय स्थिरतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.























































