
आवाजाचे जादूगर मोहम्मद रफी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असून यानिमित्ताने रफींच्या अजरामर गाण्यांची सुरेल बरसात करणाऱया कार्यक्रमांची सध्या रेलचेल सुरू आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडूनही ‘बहारों फूल बरसाओ’ या कार्यक्रमाद्वारे रफींना सूरवंदना दिली जाणार आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने उद्या सायंकाळी 6.30 वाजता वांद्रे येथील रंगशारदा नाटय़गृहात ‘बहारों फूल बरसाओ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वैशिष्टय़ म्हणजे मोहम्मद रफी यांचा संपूर्ण परिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. श्रीकांत नारायण, हृषीकेश रानडे, सरिता राजेश, धनश्री देशपांडे यांच्या सुरेल आवाजातून रफींच्या गाजलेल्या गाण्यांची बरसात या कार्यक्रमात रफीप्रेमींना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असेल, असे सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.