सॉस कमी दिला म्हणून डिलीव्हरी बॉयची हत्या केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जास्तीचा सॉस दिला नाही म्हणून एका डिलीव्हरी बॉयची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. आरोपी हा गेल्या काही महिन्यांपासून संबंधित हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना त्रास देत होता अशी देखील माहिती मिळत आहे.

ही घटना न्यूयॉर्क येथील ग्रेट वॉल नावाच्या हॉटेलमध्ये घडली. येथे 2021च्या नोव्हेंबर महिन्यात एक घटना घडली होती. आरोपी 50 वर्षांचा माणूस होता. तो या हॉटेलच्या गेट अवे दाराशी आला. तिथे त्याने त्याची ऑर्डर उचलली. पण, त्याला इथलं प्रसिद्ध डक सॉस हवं होतं. गेट अवे खिडकीवरील डिलीव्हरी बॉयने त्या सॉसची जागा दाखवली आणि तिथून घेण्यास सांगितलं. त्यानंतर आरोपीने सॉसची अख्खी बाटली उचलली आणि तो तिथून निघून गेला.

पण, काही वेळाने तो परत येऊन जास्तीचं सॉस मागू लागला. तेव्हा डिलीव्हरी बॉयने त्याला अजून थोडं सॉस दिलं. पण, आरोपीचा विचार क्षणार्धात बदलला आणि त्याने पैसे परत मागायला सुरुवात केली. पण डिलीव्हरी बॉयने त्याला नकार दिला. तेव्हा संतापलेल्या आरोपीने पोलिसांना बोलावलं. त्यांनीही डिलीव्हरी बॉयला पैसे परत देण्यास सांगितलं. पण, त्याने त्यांच्यासमोरही नकार दिला.

हा प्रकार निस्तरल्यानंतर एक वेगळंच दुष्टचक्र सुरू झालं. यांग नावाच्या त्या डिलिव्हरी बॉयला तो आरोपी सतत त्रास देऊ लागला. त्याच्या गाडीचं नुकसान करून ठेवू लागला. एकदा अशाच प्रकारे रंगेहात पकडल्यानंतर आरोपीने यांगवर बंदूकही रोखली होती. यांग हा मूळचा चिनी असल्याने तसंच संबंधित हॉटेलमध्ये अन्य कर्मचारीही चिनी असल्याने आरोपीचा कधीकधी गोंधळ उडत होता.

त्या गोंधळामुळे भलत्याच डिलिव्हरी बॉयवर त्याने गोळी झाडली. त्याचं नाव यान असं होतं. तो बाईक वरून डिलीव्हरी करायला जात होता. तेव्हा त्याला समोरून गोळी मारण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी ग्राहकाच्या गाडीशी मिळती जुळती गाडी दिसून आली आहे. दरम्यान, संबंधित हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीला अटक केल्याशिवाय हॉटेल उघडण्यास नकार दिला आहे.