
सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धडक कारवाई करून कोटय़वधी रुपयाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. त्याचप्रमाणे सोने, औषध आणि परदेशी चलनदेखील जप्त केले आहे.
सीमा शुल्क विभागाने प्रोफाईलच्या आधारे 4 प्रवाशांना अटक करून त्याच्याकडून 24 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. त्याच प्रमाणे बँकॉकहून गांजा घेऊन आलेल्या 5 प्रवाशांवर कारवाई करून त्याच्याकडूनदेखील 15.983 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केल्याची नोंद आहे. एनडीपीएस कायद्यानुसार त्या प्रवाशांवर अटकेची कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे एका प्रवाशांकडून सीमा शुल्क विभागाने 29 लाख 72 हजार 323 रुपयाचे सोने जप्त केले. सोन्या प्रमाणे एका प्रकरणात दोन प्रवाशांकडून 58 लाख 54 हजार रुपयाची औषधेदेखील जप्त केली आहे. परदेशी चलन तस्करी करणाऱ्यांनादेखील सीमा शुल्क विभागाने दणका दिला. चार प्रकरणांमध्ये सहा प्रवाशांकडून 1 कोटी 65 लाख 80 हजार रुपयांचे परदेशी चलन जप्त केले.




























































