
कीटकांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते, हाताशी आलेले धान्य उद्ध्वस्त होतं. कीटकांना मारण्यासाठी कीटकनाशकांचा वापर केला जातो. मात्र कीटकनाशकांमध्ये केमिकल असतं. त्याचा पिकांवर विपरीत परिणाम होतो. हे लक्षात घेऊन पिकांवर कीटकनाशकांचा कमीत कमी वापर व्हावा, यासाठी ओडिशातील शास्त्रज्ञांनी कीटकांना पकडण्यासाठी सौरउर्जेवर आधारित सापळा तयार केला आहे. अल्टरनेट एनर्जी लाईट ट्रप असे या उपकरणाचे नाव आहे. या उपकरणाला नुकतंच पेटंट मिळाले आहे.
कटक येथील नॅशनल राईस रिसर्च इन्स्टिटय़ूटचे मुख्य शास्त्रज्ञ श्यामरंजन दास मोहपात्रा आणि पीक संरक्षण विभागाचे माजी प्रमुख मायाबिनी जेना यांनी लाईट ट्रपचा शोध लावला आहे. या उपकरणात प्रकाशाचा वापर करून उडणाऱया कीटकांना आकर्षित केले जाते. त्यामध्ये लाईट ट्रप युनिट आहे तसेच सापळ्यात अडकलेल्या कीटकांना जमा करण्यासाठी कलेक्टर युनिट आहे. या उपकरणाला 8 फेब्रुवारी 2021 रोजी पेटंट मिळाल्याची माहिती दास मोहपात्रा यांनी दिली.
कसे चालते काम
– शेतातील पिकांमध्ये लाईट ट्रप उभारले जाते. काही लहान कीटक त्रासदायक नसतात. लहान कीटकांना मोठय़ा कीटकांपासून वेगळे करण्यासाठी कलेक्शन युनिटमध्ये दोन चेंबर असतात. त्यामध्ये पंप पावणारी जाळी असते. त्या जाळीद्वारे लहान आणि मोठे कीटक वेगळे होतात. त्रासदायक नसलेले कीटक नंतर शेतात पुन्हा सोडता येतात.
– लाईट ट्रप युनिटमध्ये सेन्सर आहे, जो सायंकाळीही प्रकाशमान होते. सेन्सर टायमरमध्ये ठरवलेल्या वेळेनुसार तीन ते चार तासांनी बंद होते. उपकरणामध्ये एक भारी बॅटरी बसवण्यात आली आहे, जेणेकरून ढगाळ आणि धुके असलेल्या हवामानातही उर्जा साठवून ठेवता येते आणि त्यावर उपकरण चालू शकते. ही बॅटरी चार ते पाच दिवस चालते.

कमी खर्च, परिणाम जास्त
उपकरण सौरउर्जेवर चालत असल्याने त्याला फारसा खर्च येत नाही. तसेच ते एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी सहज नेता येते. आर्थिकदृष्टय़ा परवडणारे आणि इकोफ्रेंडली उपकरण असून त्याला देखभाल- दुरुस्तीचा खर्चही नाही.

























































