कमी श्रमात जास्त पैशांचा मोह अनेकांना महागात पडतोय. जास्त पैसे तर दूरच स्वतःच्या खात्यात असलेली रक्कमही भामटे गायब करीत आहेत. सायबर चोरट्यांनी डिजिटल मार्केटिंगद्वारे संपर्क साधत गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. रहाटणी आणि वाल्हेकरवाडी येथे घडलेल्या दोन घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी दोघांची एकूण एक कोटीची फसवणूक केली. अल्पशिक्षित नव्हे; तर डॉक्टर, वकील, इंजिनीअर आणि अन्य उच्चशिक्षितही भामट्याचे बळी पडत आहेत. भामट्यांच्या बतावणीला बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रहाटणी येथील एक संगणक अभियंत्याला तब्बल 91 लाख रुपयांना भामट्यांनी गंडा घातला. त्यामुळे फसवणुकीचा मुद्दा समोर आला आहे.
चोऱ्या, घरफोडीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. खून, खुनी हल्ला, अपहरण, खंडणी हे गुन्हे रोजचेच बनले आहेत. महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या दुचाकीवरील चोरट्यांचा धुमाकूळ अद्याप सुरूच आहे.
तुमचे कुरिअर आले असून, त्यामध्ये अमली पदार्थ आढळले आहेत, अशी बतावणी करून चोरट्यांनी अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. त्यातच वेगवेगळी बतावणी करून चोरट्यांची हात की सफाई सुरू आहे. व्याजदराचे आमिष, काही दिवसांत दुप्पट रक्कम, कमी दरात सोने आदी आमिषे नागरिकांना भुरळ घालत आहेत.
22 लाखांची फसवणूक शेअर्स व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल, असे आमिष दाखवून एकाची 22 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना चिंचवड- वाल्हेकरवाडी येथे घडली.
विक्रांत सुभाष येडवे (वय 38, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. अभिषेक चोप्रा आणि इतर पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर्स व आयपीओमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल, असे आमिष भामट्यांनी दाखविले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 22 लाख 13 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक दीपक गोसावी अधिक तपास करीत आहेत.
संगणक अभियंत्याला 91 लाखांचा गंडा
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत संगणक अभियंत्याची 91 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना रहाटणी येथे ऑनलाइन माध्यमातून घडली. वामन लक्ष्मण एखंडे (वय 41, रा. मथुरा कॉलनी, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. अंजली शर्मा, नरेश राठी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. अंजली हिने फिर्यादी यांना एक लिंक पाठवली. त्यानंतर एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जॉईन केले. ओटीसी हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. एखंडे यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 91 लाख 63 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. गुंतवणुकीवर 7 कोटी 19 लाख 47 हजार रुपये जमा झाल्याचे आरोपींनी भासवले. त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे आणखी रकमेची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. फौजदार साळुंखे तपास करीत आहेत