बँक खाते बंद झाल्याच्या भूलथापा मारून 8 लाखांची फसवणूक

763
cyber-crime
प्रातिनिधीक फोटो

आरबीआय बँकेतून बोलतोय असे सांगून सायबर भामटय़ाने महिलेची 8 लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूकप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तक्रारदार या दहिसर येथे राहतात. त्यांची दोन खासगी बँकांत खाती आहेत. गेल्या आठवडय़ात त्यांना मोबाईलवर फोन आला होता. भामटय़ाने आपण आरबीआय बँकेतून बोलतोय असे सांगून त्यांचा कोड नंबर मागितला. त्यानंतर भामटय़ाने महिलेला तिचे बँक खाते सुरू करून देतो अशा भूलथापा मारल्या. विश्वास बसावा म्हणून त्याने नुकतेच केलेल्या दोन मोबाईलच्या रिचार्जची माहिती महिलेला दिली. तसेच एका बँकेच्या डेबिट कार्डचा अर्धवट नंबर सांगितल्यामुळे महिलेचा त्यावर विश्वास बसला. विश्वास संपादन केल्यावर भामटय़ाने महिलेच्या कार्डवरील सीव्हीसी नंबर मागितला. तिने तो सीव्हीसी नंबर शेअर केला. नंबर शेअर केल्यावर तुमचे खाते सुरू होईल असे भामटय़ाने महिलेला सांगितले.

या घटनेनंतर महिलेला पुन्हा एक फोन आला. मोबाईलवर आलेला कोड सांगण्यास महिलेला सांगितले. कोड सांगितल्यावर महिलेला एक मेसेज आला. त्यानंतर भामटय़ाने महिलेला पुन्हा कोड मागितला. तिने कोड दिल्यानंतर मोबाईलवर एक नंबर डायल करण्यास सांगितले. तिने नंबर डायल करताच तिच्या दोन्ही बँक खात्यांतून 8 लाख 25 हजार रुपये काढले गेले. घडल्या प्रकरणी महिलेने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या