
पैसे, प्रेम हवे असल्यास जादूटोणा करावा लागेल. आपल्याकडे एक जीन आहे. त्या जीनमुळे भरभराट होईल असे सांगून एकाने युवतीच्या बँक खात्यावर डल्ला मारला आहे. घडल्याप्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार युवती ही शीव परिसरात राहते. तिचे सोशल मीडियावर एक अकाऊंट आहे. तीन वर्षांपूर्वी तिने एक जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीची खात्री केल्यावर त्या खालील लिंकवर तिने क्लिक केले होते. लिंक क्लिक केल्यावर एका नंबरवरून तिला फोन आला. त्याने युवतीला नाव विचारून तिची माहिती घेतली. त्याने तिला तिचे चांगले भविष्य आहे असे भासवले. त्या चांगल्या भविष्यासाठी पूजाविधी कराव्या लागतील असे तिला सांगण्यात आले.
भविष्यात नाव, पैसा, प्रेम हवे असल्यास एक छोटा टोणा करावा लागेल. तो केल्यास आयुष्यात मागे वळून बघावे लागणार नाही. लोकांच्या तुमच्याकडे रांगा लागतील, आपल्याकडे एक जीन आहे, तो मदत करेल अशा भूलथापा मारल्या. त्यावर विश्वास ठेवून ती पूजेला तयार झाली. विधी करण्याच्या नावाखाली तिने सुरुवातीला काही पैसे दिले. 2023 ते 2026 या काळात तिने विविध खात्यांत पैसे जमा केले. पूजा करण्यासाठी तिने घरातील दागिनेदेखील विक्री केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.


























































