
‘डिजिटल अरेस्ट’ असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारांनी व्यापारी दांपत्याला तब्बल 10 तास व्हिडिओ कॉलवर ठेवून फसवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बरेली येथील प्रेम नगर परिसरात उघडकीस आली आहे. मात्र, 8वीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलाच्या प्रसंगावधानामुळे मोठी आर्थिक फसवणूक टळली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी स्थानिक व्यापारी संजय सक्सेना आणि त्यांच्या पत्नीला अज्ञात क्रमांकावरून फोन केला. स्वतःला तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी सक्सेना यांच्यावर दहशतवादी कारवायांशी संबंध आणि कोट्यवधींच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचे आरोप केले. यावेळी व्हिडिओ कॉलवर बनावट अटक वॉरंटही दाखवण्यात आले.
या धमक्यांमुळे दांपत्याला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे दबावाखाली ठेवण्यात आले. ‘डिजिटल अटक’ असल्याचे सांगत गुन्हेगारांनी त्यांना सतत व्हिडिओ कॉलवर राहण्याचे आदेश दिले. घराबाहेर न जाणे, फोन सतत चालू ठेवणे, अगदी खाणे-पिणे आणि विश्रांती घेणेही कॅमेऱ्यासमोरच करणे, अशा अटी लादण्यात आल्या.
या दरम्यान सायबर गुन्हेगारांनी दांपत्याकडून बँकेची संवेदनशील माहितीही मिळवली आणि पैशांची फसवणूक करण्याची तयारी सुरू केली. जवळपास 10 तास चाललेल्या या प्रकारात दांपत्य इतके घाबरले होते की त्यांनी कोणतीही शंका व्यक्त केली नाही.
मात्र रात्री उशिरा त्यांचा मुलगा तन्मय (इयत्ता 8वी) याला काहीतरी संशयास्पद असल्याचे जाणवले. पालक भीतीत असल्यामुळे सुरुवातीला त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तरीही तन्मयने धाडस करत मोबाईल ‘फ्लाइट मोड’वर टाकला आणि सायबर गुन्हेगारांशी संपर्क तोडला.
त्याच्या या तत्पर कृतीमुळे फसवणुकीचा डाव उधळला गेला आणि आर्थिक नुकसान टळले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सक्सेना कुटुंबाने प्रेम नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. मोबाईल पुन्हा सुरू केल्यानंतर गुन्हेगारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी पोलिसांनी फोन उचलला.
एसपी सिटी मनुष पारेख यांनी या प्रकरणाची नोंद झाल्याची पुष्टी केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “डिजिटल अरेस्ट, धमक्या किंवा तपास यंत्रणांच्या नावाखाली येणाऱ्या अशा कॉल्सपासून सावध राहावे. कोणत्याही दबावाखाली आर्थिक किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये आणि त्वरित पोलिसांना कळवावे,” असे आवाहन त्यांनी केले.



























































