‘तौकते’ चक्रीवादळाचा रत्नागिरी, सिंधुदुर्गाला तडाखा; 4 हजार लोकांचे स्थलांतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरबी सद्रात कमी दाबाच्या पट्टय़ामुळे निर्माण झालेल्या तौकते चक्रीवादळाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांना चांगलाच तडाखा दिला. रत्नागिरीत वादळामुळे 1028 घरांसह सरकारी इमारती, शाळांचे नुकसान झाले. यात 8 जण जखमी झाले तर 4 हजार लोकांचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले. सिंधुदुर्गात वादळी वाऱयामुळे 24 वीजकेंद्रे बंद पडल्यामुळे सुमारे 1 लाख 75 हजार लोकांची घरे अंधारात बुडाली आहे. दोडामार्ग 48 तास अंधारात असून मोबाईल आणि संपर्क यंत्रणा तुटल्यामुळे तालुका नॉट रिचेवल झाला आहे. बागायतींच्या नुकसानीसह झाडे उन्मळून पडली असून काही ठिकाणी नौकाही बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, कोकण रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी सांगितले, रविवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेण्यात आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जिह्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.  उद्यापासून रत्नागिरीतील नुकसानीची पाहणी करणार असून पाच ओएसडी आणि पीए जिह्यात कार्यरत राहून नागरिकांना आणि प्रशासनाला सहकार्य करणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले. चक्रीवादळात जिह्यातील 4 हजार 803 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरीत 363, दापोलीत 2373, मंडणगड 808, गुहागर 0687 आणि राजापूरमध्ये 652 जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

खेडमध्ये वीजवाहिनीचा धक्का लागून पती–पत्नीचा मृत्यू

खेडमध्ये चक्रीवादळामुळे तुटून रस्त्यावर पडलेल्या 33 केव्ही वीज वाहिनीचा धक्का बसून बोरज येथील पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास बोरज जि. प. शाळेजवळ घडली. बोरज घोसाळकरवाडी येथील प्रकाश गोपाळ घोसाळकर आणि त्यांची पत्नी वंदना प्रकाश घोसाळकर हे दोघे दुचाकीने लोटे येथे गेले होते. लोटे येथील काम संपवून ते सायंकाळी परतत असताना रस्त्यावर तुटून पडलेल्या 33 केव्ही वीज वाहिनीचा धक्का या दोघांना बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

रविवारपासून सुरू असलेल्या चक्रीवादळाच्या कहरामुळे अनेक ठिकाणी घरांचे नुकसान, झाडे उन्मळून पडणे, रस्ता बंद, नौका बुडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सध्या कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. मात्र काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याची माहिती पुढे आली आहे. आज सकाळी आठ वाजता जिल्हा आपत्ती कक्षात नोंदवलेल्या माहितीनुसार कणकवली 192 , मालवण 290, वेंगुर्ला 180 आणि कुडाळमध्ये 203 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. जिह्यातील ग्रामीण भागात घरे, गोठे पडझडीच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडल्या आहेत. याबाबत महसूल पातळीवर पंचनामे सुरू आहेत. मात्र काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंदच्या स्थितीत आहेत अशी माहिती जिल्हा आपत्ती कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

कुडाळात 1 कोटी 14 लाखांचे नुकसान

तालुक्याला बसलेल्या तडाख्यात गावोगावी घरे, गोठे, मांगर तसेच सार्वजनिक इमारतींची पडझड होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात सुमारे 301 घरे, 15 सार्वजनिक इमारती, 17 गोठे यांची पडझड झाली तर 25 रस्त्यांचे नुकसान झाले. या सर्वांचे मिळून तालुक्यात सुमारे 1 कोटी 14 लाख 91 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.

वैभववाडीत 27 घरांचे नुकसान

वैभववाडी तालुक्यात 27 घरांचे नुकसान झाले आहे. तर एका ठिकाणी झाड पडले असून 2 शाळांचे, एका स्मशान शेडचे आणि एका शेळीपालन शेडचे नुकसान झाले आहे. विद्युत पोलही पडला आहे.

दोडामार्गात बागायतींचे नुकसान

ओटवणे मुख्य रस्त्यावर कापाईवाडी येथे मुख्य रस्त्यावर झाड कोसळले असून हे झाड विद्युत वाहिनीवर पडल्याने विद्युत वाहिनी तुटून रस्त्यावर आल्या. झाड बराच वेळ रस्त्यावरून हटवले नसल्यामुळे हा मार्ग बंद होता. केळी, सुपारी बागायतींचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पाण्याअभावी आचरेकरांचे हाल 

वादळासह आलेल्या उधाणाचा फटका आचरा गावाला बसला. पाणी वस्तीत शिरून घराच्या भिंती कोसळल्या तर काहींच्या घरावर झाडे कोसळली. पावसाळी बेगमीसाठी साठवलेले धान्य, भांडीकुंडी वाहून गेली. वादळामुळे गाऊडवाडी, जामडूल, पिरावाडी, हिर्लेवाडी, पारवाडीतील रहिवाशांना विजेअभावी पाणी पुरवठा बंद होता. लाईट नसल्याने आणि विहिरीमध्ये खारे पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल झाले. सिंधुदुर्ग जिह्यात 24 वीज उपपेंद्रे बंद पडली आहेत.

देवगडात दोन मासेमारी नौका बुडाल्या; चार खलाशी बेपत्ता; एकाचा मृतदेह सापडला, तीन सुखरूप

देवगड किनाऱयावर नांगरून ठेवलेल्या  6 मासेमारी नौकाना वादळाचा मोठा फटका बसला. यात रघुनाथ कोयंडे याच्या दोन नौका वाहत जाऊन बेपत्ता झाल्या आहेत तर चार नौका खडकाळ भागात अडकल्या. दोन नौका बुडाल्या असल्याचे समजते त्यावरील 7 खलाशांपैकी 3 खलाशी पडवणे किनारी पोहत सुखरूप पोहचले तर उर्वरीत 4 खलाशी बेपत्ता झाले असून एका खलाशाचा मृतदेह सापडला आहे उर्वरित खलशांचा शोध घेण्यात येत आहे. मालवण येथील रणजीत खंदारे यांची नौका आनंदवाडी येथील स्मशानभूमी नजीकच्या खडकात अडकली.

 घरांचे मोठे नुकसान

चक्रीवादळामुळे जिह्यात घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. मंडणगडमध्ये 204 घरे, दापोली 380, खेडमध्ये 30, गुहागरमध्ये 5, चिपळूणमध्ये 65, संगमेश्वरमध्ये 102, रत्नागिरीत 200, लांजामध्ये 44 आणि राजापुरात 32 घरांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्यानंतर घरांच्या नुकसानीची आकडेवारी कळणार आहे.

परीक्षा पुन्हा होणार 

चक्रीवादळामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्या नाहीत. त्या सर्व परीक्षा पुन्हा होणार आहेत. त्याचा निर्णय आज मुंबईतील बैठकीत आम्ही घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. 

दोडामार्ग 48 तास अंधारात

चक्रीवादळाच्या तडाख्याने सलग दोन दिवस दोडामार्ग तालुका अंधारात राहिला तर बीएसएनएलसह अनेक मोबाईल व संपर्क यंत्रणा तुटल्याने तालुका नॉट रिचेबल झाला आहे. अद्यापही वीज व बीएसएनएल मोबाईल यंत्रणा ठप्पच आहे. शनिवारी सायंकाळी 8 च्या सुमारास वादळाचा परिणाम दोडामार्गमध्ये दिसून आला. शनिवारी सायंकाळपासून सोसाटय़ाचा वारा व पावसाने दोडामार्गला आज सकाळपर्यंत झोडपून काढले. या वादळात दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गासह अनेक रस्त्यांवर झाडे कोसळून व विजेचे खांब कोसळून रस्ता काही काळ ठप्प होता.

 तौकते वादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गातील 3665 गावांचा वीज पुरवठा खंडित

‘तौकते’ चक्रीवादळाचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातील 3665 गावातील वीज यंत्रणेला तडाखा बसला आहे. त्यामुळे 18 लाख 43 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे 13 हजार 172 कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून जवळपास 10 लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. ‘तौकते’ चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले असून वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने वीज यंत्रणेची मोठी हानी झाली आहे. महावितरणच्या 138 उपकेंद्रांचा वीज पुरवठा बंद पडला होता. त्यापैकी 78 उपपेंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तर चार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसह 210 पैकी 173 कोविड सेंटर्स व लसीकरण केंद्रांचा वीज पुरवठा अवघ्या दोन तासांमध्ये पूर्ववत करण्यात आला.