‘मोंथा’ तडाखा, महाराष्ट्रातील सात मच्छीमार बोटी बेपत्ता

मोंथा वादळामुळे अरबी समुद्र खवळलेला असून राज्यभरातील सात मच्छीमार बोटी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता आहेत. या बोटी समुद्रात भरकटल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अनेक अडथळे येत असल्याने बोटींचे लोकेशन नेमके कुठे आहे याचा शोध अद्याप तटरक्षक दलाला लागलेला नाही. दोन बोटी पालघरपासून सुमारे 124 किलोमीटर अंतरावर असून काही बोटी राज्याच्या सागरी हद्दीच्या बाहेर गेल्या असल्याचे तटरक्षक दलाने स्पष्ट केले आहे.

मच्छीमार बोटींपैकी कौसा-ठाणे येथील अब्दुल्ला खान यांच्या मालकीची श्री साई समर्थ कृपा बोटीचा व त्यावरील खलाशांचा थांगपत्ता लागलेला नाही. माहुल-मुंबई येथील चार मच्छीमार बोटींचाही अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. या चार मच्छीमार बोटींमध्ये गौरी (मालक-मालती वैती), साईराम (मालक – महेंद्र वैती), हरीओम कृपा (मालक – कांचन वैती), सत्यसाई (महेंद्र वैती) या बोटींचा समावेश आहे. या चारही बोटींवर 32 खलाशी आहेत. वायरलेसवर बोटींवरील खलाशी व मालकांशी सुस्पष्ट संवाद होत नसल्याने पाच दिवसांपासून ते कोणत्या ठिकाणी आहेत याचा सुगावा अद्यापही लागला नसल्याचे सहाय्यक आयुक्त अविनाश नाखवा यांनी सांगितले.

  • न्हावा-पनवेल येथील सचिन पाटील यांच्या मालकीची चंद्राई व सत्यवान पाटील यांच्या मालकीची श्री गावदेवी मरीन या दोन्ही बोटी पालघर किनाऱ्यापासून 124 किमी सागरी अंतरावर असल्याचे दिसून आले आहे. यापैकी चंद्राई बोट बंद पडली आहे. श्री गावदेवी मरीन टोइंग करून परतीच्या प्रवासाला लागली आहे.
  • भाऊचा धक्का-मुंबई बंदरातील चार बोटी राज्याची सागरी सीमा ओलांडून 72 सागरी मैलापर्यंत पोहोचल्या आहेत. या चारही बोटी तटरक्षक दलाच्या निगराणीखाली असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाने सांगितले.
  • करंजा येथील शिवलीला ही बोट वादळात भरकटली होती. ही बोट आज दुपारी 12 वाजता बंदरात सुखरूप आली आहे, असे मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी सांगितले.
  • ससून डॉक- मुंबई बंदरातील वादळात भरकटलेल्या आई तुळजा भवानी, चंद्रभागा, गावदेवी या तीनही मच्छीमार बोटींचा शोध लागला आहे. या तीनही बोटी खलाशांसह परतीच्या प्रवासाला निघाल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी दिली आहे.