
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यानंतर आता कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. मनी लॉण्डरिंग प्रकरणी शिवकुमार यांना ताब्यात घेतल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
‘डीके’ म्हणून प्रसिद्ध असलेले शिवकुमार हे कर्नाटकाच्या राजकारणातील बडे नेत आहेत. मनी लॉण्डरिंग प्रकरणी आज चौथ्यांदा शिवकुमार यांची ईडीने चौकशी केली. दिवसभराच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. उद्या (दि. 4) शिवकुमार यांना न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान, अटकेनंतर शिवकुमार यांनी ट्विट केले आहे. मला अटक करण्याचे भाजप मित्रांचे मिशन यशस्वी झाले, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे ‘संकटमोचक’
‘डीके’ या नावाने परिचित असलेले शिवकुमार हे काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. 2017 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदारांना कर्नाटकात नेण्यात आले होते. त्याची जबाबदारी शिवकुमार यांच्यावर होती. कुमारस्वामी यांचे काँग्रेस-जेडीएस सरकार वाचविण्याचा प्रयत्न शिवकुमार यांनी केला. मात्र, कुमारस्वामी सरकार कोसळले आणि भाजप नेते येडीयुरप्पा हे मुख्यमंत्री बनले.
काय आहे प्रकरण
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये डी. के. शिवकुमार यांच्यासह नवी दिल्लीतील कर्नाटक भवनमधील कर्मचारी हनुमंथैया यांच्याविरोधात मनी लॉण्डरिंगचा गुन्हा ईडीने दाखल केला होता. आयकर विभागाने दाखल केलेल्या आरोपांआधारे हा गुन्हा नोंदविला होता. शिवकुमार यांनी हवाला रॅकेटमार्फत कोटय़वधी रुपयांची देवाण-घेवाण केल्याचा आरोप आहे.
30 ऑगस्टला शिवकुमार ईडीसमोर पहिल्यांदा हजर झाले. ईडीने पाठविलेल्या समन्सला शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती.


























































