
मुंबई महानगगर पालिकेने शहर आणि दोन्ही उपनगरात राबवलेल्या ‘बेकायदा फेरीवाला हटाव’ आणि व्यापक स्वच्छता मोहिमेमुळे सर्व स्तरातून पालिकेचे कौतुक केले जात आहे. दादरमध्ये रेल्वे स्थानक परिसरात ही मोहीम मोठय़ा प्रमाणावर राबवण्यात आल्याने दिवसरात्र गजबजलेला परिसर वाहतूक कोंडीमुक्त झाला असून प्रवाशी, रहिवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जी उत्तर विभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, लेडी जमशेटजी मार्ग, कटारिया मार्ग, 60 फुटी मार्ग, 90 फुटी मार्ग, शिवाजी पार्क परिसरातील रस्ते अधिक स्वच्छ झाले आहेत. काही प्रमुख पदपथ फेरीवालामुक्त झाले आहेत. वाहतूक पोलीस तैनात असल्याने वाहतूक कोंडीतून दादरची सुटका झाली आहे.
रस्ते, पदपथ धूळमुक्त करण्याबरोबर फेरीवालामुक्त करण्याचा उपक्रम पालिकेकडून राबविला जात आहे. यासाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. स्वतंत्र पथकेदेखील गठीत करण्यात आली आहेत, असे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले.
z रस्ते, पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, सार्वजनिक प्रसाधनगृहांची दिवसातून 3 वेळा स्वच्छता व निर्जंतुकीकरण, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान-क्रीडांगणांची निगा, निर्मळ कर्मचारी वसाहत, फेरीवाला विरहित क्षेत्र, राडारोडा मुक्त परिसर आदी कार्यवाही केली जात आहे.




























































