दादरला चक्कर येऊन तरुण ट्रॅकवर पडला, रेल्वे पोलिसाने वाचवले प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईलवर बोलत असताना अचानक चक्कर येऊन ट्रॅकमध्ये पडलेल्या तरुणाचे दादर रेल्वे पोलिसांनी प्राण वाचवले. पोलीस शिपाई राजेश भडाळे यांनी तरुणाला वेळीच उपचारासाठी नेले. जखमी तरुणाची प्रकृती स्थिर आहे. दादर रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आंबिवली येथे राहणारा अंकित शुक्ला हा सांताक्रुझ येथे काम करतो. तो दररोज दादर रेल्वे स्थानकातून परळ टर्मिनसला जाणारी लोकल पकडतो. त्यानंतर परळ येथून सुटणाऱ्या लोकलने तो आंबिवलीला जातो. शनिवारी रात्री अंकित हा दादरच्या फलाट 3 वर आला. तो फोनवर बोलत होता. फोनवर बोलत असताना तो अचानक ट्रॅकमध्ये पडला. तेथे पोलीस शिपाई राजेश भडाळे, महिला पोलीस सावंत आणि एमएसएफचे जवान गस्त घालत होते.

अंकित ट्रॅकवर पडल्याचे भडाळे यांनी पाहिले. त्यादरम्यान समोरून लोकल येत होती. भडाळे हे ट्रॅकमध्ये उतरले. जखमी अवस्थेत अंकितला बाजूला काढले. त्यानंतर ट्रॅकच्या बाजूलाच अंकितवर प्रथमोपचार केले. लोकल गेल्यानंतर त्याला फलाटावर आणले. भडाळे यांनी रेल्वे हमालाची वाट न पाहता जखमी अंकितला खांद्यावर घेऊन फलाट क्रमांक 6 येथील दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले.