रुग्णवाहिकेला पाच तास उशीर, डहाणूत मातेचा तडफडून मृत्यू, उपचाराअभावी बाळही दगावले; ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे

वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांतच मातेचाही तडफडून जीव गेल्याची धक्कादायक घटना डहाणूत घडली आहे. प्रसूतीनंतर प्रकृती गंभीर झाल्याने कैनाड बाडुपाडा येथील 25 वर्षीय सायनु सावर हिला कॉटेज ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी बलसाड येथे हलवण्यास सांगितले. मात्र 108 क्रमांकाची रुग्णवाहिका तब्बल पाच तास उशिरा आली. त्यामुळे अधिक रक्तस्त्राव झाल्याने सायनुचा मृत्यू झाला. बाळासह मातेच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडेच निघाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

सायनु हिचे सासर डहाणू तालुक्यातील गंजाड सोमनाथ डोंगरीपाडा येथे आहे. पती मासेमारीसाठी बोटीवर तर सासू-सासरे वीटभट्टीवर मजुरीचे काम करतात. त्यामुळे ती प्रसूतीसाठी आपल्या माहेरीच कैनाड बाडुपाडा येथे राहत होती. रविवारी सकाळी दहा वाजता सायनुला प्रसूती कळा सुरू होताच तिच्या घरच्यांनी रिक्षातून दहा कि. मी. अंतरावर असलेल्या आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डहाणू येथील कॉटेज ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर दुपारी दोन वाजता सायनुची नॉर्मल प्रसूती झाली. परंतु काही वेळातच बाळ दगावले. दरम्यान प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने सायनुचीदेखील प्रकृती ढासळू लागली.

अहो, डॉक्टरसाहेब लवकर अॅम्ब्युलन्स बोलवा ना..

सायनुची प्रकृती ढासळू लागल्याने तिला बलसाड येथे रुग्णालयात हलवण्यास सांगितले. त्यानंतर तत्काळ सरकारी 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला. त्यांना सर्व माहिती देऊन लवकरात लवकर रुग्णवाहिका आणण्यास सांगण्यात आले. मात्र तब्बल पाच तास उशिराने ही रुग्णवाहिका आली. तोपर्यंत वेदनेने व्याकुळ झालेल्या सायनुची परिस्थिती पाहून नातेवाईक पुरते हादरून गेले होते. डॉक्टरसाहेब लवकर अॅम्ब्युलन्स बोलवा ना, अशी विनवणी करत होते. दरम्यान अधिक रक्तस्त्राव झाल्याने वाटेतच सायनुचा मृत्यू झाला.

सरकारला केव्हा जाग येणार?

सायनुच्या मृत्यूनंतर तिच्या भावाने संताप व्यक्त केला आहे. रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर माझी बहीण वाचली असती. माझ्या भाच्याला जग पाहता आले असते. मात्र आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे हा बळी गेला आहे. अजून किती आदिवासींचे मृत्यू झाल्यावर सरकारला जाग येईल, असा संतापही त्यांनी व्यक्त केला असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सदर महिला कदाचित कामावर असताना पोटावर पडली असावी. आम्ही वेळेत उपचार करून प्रसूती केली. पण अतिरक्तस्त्रावामुळे प्रकृती खालावली. त्यामुळे सायनुला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले होते.
– डॉ. रामदास महाड, सिव्हिल सर्जन, पालघर