
दोन आठवड्यांच्या लपाछपीनंतर परतलेल्या पावसामुळे वातावरणात पसरलेला गारवा आणि आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाक्यानाक्यांवर बांधल्या जाणाऱ्या लाखमोलाच्या दहीहंड्यांमुळे यंदाचा गोपाळकाला खास ठरणार आहे. गेले दोन महिने सरावासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे गोविंदा पथके ‘गोविंदा रे गोपाळा’बरोबर आता ‘घाबरायचं नाय’ याच अंदाजात थरांची नवी उंची गाठण्यासाठी गल्लोगल्ली उतरणार आहेत. मुंबई आणि ठाण्यात दहीकाल्याचा कल्ला तर होणारच आहे.
कोकणपट्टीत पुढील चार दिवस पावसाच्या जोरदार बॅटिंगच्या हवामानाच्या अंदाजामुळे गोविंदा पथकांचा उत्साह दुणावलाय. परंपरा जपणाऱया दहीहंडीपासून थरसलामी देण्यासाठी एका मिनिटाच्या आत रचल्या जाणाऱया मानवी मनोऱयांच्या स्पर्धेमुळे गिरणगावचा पारंपरिक गोविंदा आता ग्लोबल झालाय, त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे दहा लाखांच्या हंडय़ाही सामान्य झालेल्या दिसताहेत. इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या पब्लिसिटीसाठी जागोजागी हंडय़ांचा आधार घेतल्याचे चित्र दिसतेय. सोबतीला बक्षिसांच्या वर्षावाचीही स्पर्धा रंगली आहे.
थर रचण्याची वाढलेली स्पर्धा आणि आधी सराव, मग थर रचण्याच्या पद्धतीमुळे दुखापतींच्या कमी झालेल्या प्रमाणामुळे सहा-सात थर सोडा, आठ थर रचणारे गोविंदा पथकही कॉमन झाले आहेत. सध्या नऊ थर रचणाऱया पथकांची संख्या 20 पेक्षा अधिक असल्यामुळे त्यापैकी किमान पाच पथके ‘दस का दम’ दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोणता संघ सर्वप्रथम दहाची उंची गाठतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तूर्तास जोगेश्वरीच्या ‘जय जवान’सह ‘आर्यन्स’, ‘कोकण नगर’, ठाण्यातला ‘खोपटचा राजा’, बोरिवलीचा ‘शिवसाई’ आणि ‘माझगाव ताडवाडी’ ही मंडळं दशथरारासाठी जोर लावणार आहेत.
गोपिका सज्ज…
गेल्या महिनाभरापासून महिला गोविंदा पथकांचे सराव जोरात सुरू आहेत. लोअर परळ येथील बाल दत्तगुरू गोविंदा पथकाच्या गोपिका मोठय़ा उत्साहाने दहीहंडीचा सराव करताना दिसत आहेत. पार्ले स्पोर्ट्स क्लब ‘जोगेश्वरी माता’, ‘शिवशक्ती’ (वडाळा), ‘स्वस्तिक’सारखी पथके सातव्या थरावर पोहोचण्यासाठी उत्सुक आहेत. गोविंदा पथकांसह गोपिकांच्या पथकांचीही संख्या शंभरीपलीकडे पोहोचली आहे.
निवडणुकांचा माहोल; पैशांचा धो-धो वर्षाव होणार
पालिका निवडणुकांचा माहोल असल्याने यंदाच्या दहीहंडीत पैशाचा धो-धो पाऊस पडणार आहे. ठाणे शहर गोविंदा पथकांसाठी नेहमीच हॉट फेव्हरिट असले तरी मुंबईत वरळीपासून बोरिवलीपर्यंत, वडाळय़ापासून मुलुंडपर्यंत शेकडो लाखा-लाखांच्या हंडय़ांची स्पर्धा लागलीय. या आयोजनात सलामी देण्यासाठी मुंबई-ठाण्यातील किमान तीन हजार गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. यात तब्बल दीडशेच्या आसपास गोविंदा पथके ही आठ थरांची आहेत. त्यामुळे गोविंदांवर पावसाच्या कृपेसह बक्षिसांचीही वृष्टी होणार हे निश्चित आहे.