दहिसरमधील पूल, रस्तारुंदीकरणाचा मार्ग मोकळा; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

दहिसर येथील यशवंत तावडे रोडवर विकास आराखडय़ात मंजूर झालेला पूल आणि हरिश्चंद्र महाजन मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. या दोन्ही कामांसंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक नगरसेवक-विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर आणि पालिका अधिकारी यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वीच बैठक झाली. त्यानंतर आज तातडीने पालिका अधिकाऱयांनी संबंधित ठिकाणी जाऊन आढावा घेतला.

प्रभाग क्र. 16 चा वाहतूक प्रश्न सोडवण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत होती. हा पूल विकास आराखडय़ातही मंजूर होता. मात्र या कामाला गती मिळत नव्हती. या पार्श्वभूमीवर महापौरांसोबत झालेल्या बैठकीत पुलासाठी आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून काम सुरू करावे असे निर्देश महापौरांकडून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर यशवंत तावडे मार्ग येथून दहिसर पश्चिमेकडे जाणाऱया पुलाच्या कामासंदर्भात हर्षद कारकर यांनी पूल विभाग अभियंता ठोसर, उमरजे यांच्या उपस्थितीत पाहणी केली. यावेळी पालघर जिल्हा युवती अधिकारी दीक्षा कारकर उपस्थित होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या