दै. ‘सामना’चे सचिन वैद्य यांच्या छायाचित्रणाला ‘लोकभवन’ची दाद, दिनदर्शिकेमध्ये तीन छायाचित्रांना मानाचे स्थान

राजभवनाचे नाव ‘लोकभवन’ झाल्यानंतर प्रथमच प्रकाशित होत असलेल्या 2026 वर्षाच्या ‘लोकभवन’च्या दिनदर्शिकेत दै. ‘सामना’चे छायाचित्रकार सचिन वैद्य यांनी टिपलेल्या तीन छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. वैद्य यांनी मागील दहा वर्षांत ‘लोकभवन’चे विविधांगी छायाचित्रण केले आहे. त्यांच्या अनोख्या छायाचित्रण शैलीला ‘लोकभवन’च्या दिनदर्शिकेत मानाचे स्थान मिळाले आहे.

नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेत लोकभवनातील विविध ऐतिहासिक वास्तू, त्यांची थोडक्यात माहिती तसेच लोकभवनातील प्रसिद्ध मोर यांच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या पुढाकाराने दिनदर्शिकेची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये सचिन वैद्य यांनी लोकभवनाचे विविधांगी छायाचित्रण केले आहे. यापूर्वीच्या राजभवनच्या दिनदर्शिकेत व 2018मध्ये राज्यपालांच्या ’जार्ंनग टुवर्ड्स न्यूअर माइलस्टोन्स’ कॉफी टेबल बुक आणि पुस्तकातदेखील सचिन वैद्य यांच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला होता.