दलित व्यक्तिचं जबरस्तीने धर्मांतरण; सुंता करून गोमांस खायला लावलं

एका दलित व्यक्तिचं जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आल्याची घटना कर्नाटकच्या हुबळी येथे घडली आहे. या व्यक्तिची सुंता करण्यात आल्याचा तसेच जबरदस्तीने गोमांस खायला घातल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी श्रीधर गंगाधर (26) या व्यक्तिने तक्रार दिली आहे. या प्रकरणात 12 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. श्रीधर याच्या तक्रारीनुसार, मांड्या जिल्ह्यातील अत्तावर रहमान नावाच्या माणसाच्या संपर्कात तो आला होता. रहमान त्याला बेंगळुरू येथील बनाशंकरी मशिदीत घेऊन गेला.

तिथे अजीज नावाचा एक माणूस त्याला इस्लामची पठणं शिकवू लागला. त्यानंतर त्याला तिथल्या अनेक मशिदींमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर त्याची सुंता देखील करण्यात आली, तसंच त्याला जबरदस्तीने गोमांस खाऊ घालण्यात आलं, असा आरोप श्रीधरने केला आहे. जेव्हा गोमांस खाण्यासाठी श्रीधरने नकार दिला, तेव्हा त्याला मारहाणही करण्यात आली.

या खेरीज त्याला कमीत कमी तीन हिंदूंना मुसलमान धर्मात धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तसंच, एक दिवस त्याच्या हातात पिस्तुल देऊन त्याचा फोटो देखील काढण्यात आला, असा आरोप श्रीधरने केला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असली तरी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.