
फिलीपिन्समध्ये धुमाकूळ घातल्यानंतर खतरनाक बुआलोई वादळ आता वेगाने व्हिएतनामच्या दिशेने सरकले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी व्हिएतनामच्या मध्य आणि उत्तरेकडील भागातून हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. हे वादळ प्रतितास 133 किमीपेक्षा अधिक वेगाने व्हिएतनामकडे येत असून त्यामुळे मुसळधार पाऊस व अनेक भागांत भूस्खलनाची शक्यता आहे.
बुआलोईच्या प्रकोपामुळे शुक्रवारपासून मध्य फिलीपिन्समध्ये किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. वादळामुळे अनेक शहरे आणि गावांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. सुमारे 23 हजार कुटुंबांना 1,400हून अधिक आपत्कालीन केंद्रांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.


























































