
सामना ऑनलाईन । दापोली
सहलीसाठी निघालेल्या दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस पोलादपूर येथील आंबेनळी घाटात ५०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताला वेगळे वळण लागले आहे. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबत एक निवेदनही देण्यात आले आहे.
पोलादपूर अपघातामध्ये सहलीसाठी निघालेल्या ३० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सुदैवाने कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक प्रकाश सावंत-देसाई हे यातून बचावले होते. परंतु या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंबेनळी घाटात ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते अपघात क्षेत्र नसल्याचे स्थानिक, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे. अपघातावेळी बस झाडाला धडकली आणि नंतर दरीत कोसळली. हे सर्व एका क्षणात घडले. असे असतानाही एखाद्या व्यक्तीला बसमधून बाहेर पडण्याचा अवधी कसा मिळाला याबाबत निवेदनातून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

तसेच अपघातानंतर सावंत यांनी सांगितले की, त्यांनी बसमधून उडी मारली आणि ते वाचले. परंतु टीव्ही वाहिन्यांवर दाखवल्यानुसार संपूर्ण दरी ही भिंतीसारखी उभी असून ती चढून येणे अनुभवी ट्रेकर्स, एनडीआरएफलाही शक्य नव्हते म्हणून ते दोऱ्या बांधून खाली उतरले. मात्र सावंत हे कोणत्याही आधाराशिवाय शेवाळ आलेल्या, पावसाने निसरड्या झालेल्या कड्यावरून वर कसे आले? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच दरीत पडल्यावर आणि दरीतून वर येतानाही सावंत यांना थोडेही खरचटले नाही हे अशक्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अपघातावेळी सावंत हे गाडी चालवण्यासाठी बसले असण्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. आणि त्यामुळेच त्यांना जीव वाचला असावा अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे या अपघाताची व सावंत यांचे संशयास्पद वर्तन व परस्परविरोधी वक्तव्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.



























































