
राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. ‘दोन डोस झाले, आता टेन्शन खल्लास’ अशा मानसिकतेतून दोन डोसवाले लोक नियम मोडताहेत. ते मास्क तोंडावरून खाली उतरवून बिनधास्त फिरतात. त्यामुळेच इतरांच्या तुलनेत दोन डोसवाल्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे, असे मत नोंदवत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी तोंडावरचा मास्क खाली उतरवून फिरणाऱया नागरिकांमुळे कोरोनाची तिसरी लाट धडकू शकते, अशी भीती व्यक्त करीत अजित पवार यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. डोस घेतलेल्या लोकांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही डॉक्टर, वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन डोस घेतल्यानंतर लोक नियम पाळण्यात हयगय करतात. मास्क वापरत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात संसर्ग वाढतो आहे. लसीचे दोन्ही डोस घेतले तरी आपल्याला कोरोनाचे नियम मोडून चालणार नाही. सरकार कोरोना निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करीत आहे. पण नागरिकांनी मास्क वापरलाच पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलेच पाहिजे, स्वतःसोबत कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
सर्वेक्षणातील निष्कर्ष
z राज्यात वेगाने कोरोना लसीकरण सुरू आहे. असे असताना लस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकताच सर्व्हे केला.
z सरकारच्या सर्व्हेनुसार, लसीचा पहिला डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण 0.19 टक्के आहे, तर दोन डोस घेतलेल्यांमध्ये 0.25 टक्के आढळले आहे.





























































