
सामना प्रतिनिधी । मालवण
चिंदर पालकरवाडी येथील दिलिप दत्ताराम सांडव (वय ६७) यांचा मृतदेह त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आला. घर बंद असल्याने आचरा पोलिसांनी गॅलरीचा दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतला. अधिक तपास आचरा पोलीस करत आहेत.
दिलिप दत्ताराम सांडव यांचे कुटुंब मुंबईला असते. दिलीप हे चिंदर पालकरवाडी येथील आपल्या घरात एकटेच राहत होते. चिंदर ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी सांडव यांचे त्यांच्या पत्नीशी फोनवरून बोलणे झाले होते. रविवारी सांडव यांच्या पत्नीने केलेला फोन त्यांनी उचलला नव्हता. सोमवारी पण फोन उचलत नसल्याने सांडव यांच्या पत्नीने लब्देवाडीतील नातेवाईकांना फोन करून दिपक यांची माहिती काढण्यास सांगितले. यावेळी सदर नातेवाईकांने घरी जाऊन पाहिले असता घर बंद असून दुर्गंधी येत होती.
याबाबत आचरा पोलिसांना माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर, हेड कॉन्स्टेबल बाबू देसाई, अक्षय धेंडे, कांबळी आदीं घटनास्थळी दाखल झाले. घरातून मोठ्या प्रमाणत दुर्गंधी येत होती. याबाबत दिलिप सांडव यांच्या मुलाशी फोन वरून संपर्क साधल्यावर गॅलरीचा दरवाजा तोडून आत जाण्यास सांगितले. दरवाजा तोडून आत गेल्यावर सांडव यांचा मृतदेह बेडवर मृतावस्थेत आढळून आला. याबाबत आचरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.




























































