नगरच्या नेप्ती शिवारात मृतदेह आढळला; गळा दाबून खून केल्याचे उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

नगरच्या नेप्ती शिवारात एका 45 वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. त्याचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले असून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलाच्या पाईपमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. ही घटना रविवारी नेप्ती शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर-कल्याण रस्त्यावर नेप्ती गावच्या शिवारात जखणगावकडे जाणार्‍या रस्त्यावर पुलाच्या पाईपमध्ये 40 ते 45 वर्षांच्या अनोळखी व्यक्तीचाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल केला. 18 एप्रिलपूर्वी ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलीस नाईक राहुल शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात कारणाने अज्ञात व्यक्तीने गळा दाबून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुलाच्या पाईपमध्ये लपवून ठेवला, असे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सपोनि राजपूत, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास सपोनि राजपूत करीत आहेत.