महापालिकेच्या मतदारयाद्या; हरकती आणि सूचनांसाठी 15 डिसेंबरची मुदत

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांबाबत हरकती, सूचना नोंदवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तिसऱयांदा मुदतवाढ दिली असून, आता मतदारांना 15 डिसेंबरपर्यंत हरकती, सूचना दाखल करता येणार आहेत. यानुसार अंतिम मतदान केंद्रनिहाय यादी 27 डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे.

पालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी पहिल्यांदा 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्यामुळे हरकती, सूचना दाखल करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत होती. यानुसार आयोगाच्या सूचनेनुसार पालिकेने पहिल्यांदा 3 डिसेंबर, नंतर 10 डिसेंबर तर आता 15 डिसेंबरपर्यंत हरकती, सूचना दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

मतदार यादीतील गडबड स्पष्ट आहे. आम्ही त्यांना या प्रक्रियेत हस्तक्षेप करताना पकडलं आहे. ही चूक मुद्दाम झाली की चुकून हे 15 तारखेला अंतिम यादी बाहेर आल्यावर स्पष्ट होईल. – आदित्य ठाकरे, शिवसेना नेते