
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात अंतरिम व्यापार करारावर अंतिम फेरीची चर्चा सुरू आहे. यातच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एक मोठं विधान केलं आहे. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर बोलताना ते म्हणाले आहेत की, “हिंदुस्थान कोणत्याही व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी घाई करणार नाही आणि हा करार केवळ हिंदुस्थानच्या अटींवर आणि राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊनच होईल.” अमेरिकेने 9 जुलैपर्यंत दिलेल्या मुदतीपूर्वी अंतरिम व्यापार करार पूर्ण करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. यातच गोयल म्हणाले आहेत की, हिंदुस्थान कोणत्याही दबावाखाली करार करणार नाही.
दिल्लीत B2B Toy Expo दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना पीयूष गोयल म्हणाले, “हिंदुस्थान आपल्या अटींवरच चर्चा करतो. व्यापार करार तेव्हाच होईल जेव्हा तो दोन्ही देशांसाठी फायदेशीर असेल. राष्ट्रीय हित नेहमीच सर्वोच्च असेल. जर करार हिंदुस्थानच्या हिताला पूरक असेल, तरच आम्ही पुढे जाऊ.” त्यांनी युरोपियन युनियन, न्यूझीलंड, ओमान, चिली आणि पेरूसह इतर देशांशी सुरू असलेल्या व्यापार चर्चांचाही उल्लेख केला आणि हिंदुस्थान कोणत्याही कालमर्यादेच्या दबावाखाली करार करणार नाही, असे सांगितले.
दरम्यान, हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील हा व्यापार करार दोन्ही देशांमधील व्यापाराला 2030 पर्यंत 190 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याच्या उद्देशाने आहे. ज्याला ‘मिशन 500’ असे नाव देण्यात आले आहे. हा करार पहिल्या टप्प्यात मर्यादित वस्तूंवर केंद्रित असेल, तर कृषी आणि दुग्धजन्य उत्पादने यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांचा समावेश नंतरच्या टप्प्यात होईल.