पालीला पळवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

आंध्र प्रदेशमध्ये पालीला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुंटूर जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता ही घटना घडली आहे. या घटनेने पोलीस अधिकाऱ्याच्या कटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव शेष राव असे आहे. ते सध्या बदलीच्या प्रतीक्षेत होते. त्याचदरम्यान ही दुर्घटना घडली आहे.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फूटेजमध्ये शेष राव हातात झाडू घेत घरात शिरलेल्या पालीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचवेळी पालीला बाहेर काढताना त्यांचे संतुलन बिघडले आणि ते दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळतात, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

शेष राव पत्नीसह बाहेरच्या खोलीत येतात. तेथे छतावर त्यांना पाल दिसते. ते झाडू हातात घेत पालीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पालीला बाहेर काढण्यासाठी ते जिन्याकडे जातात. त्याचवेळी त्याचे संतुलन बिघडते आणि ते खाली कोसळतात. या दुर्घटनेत शेष राव गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान राव यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर राव यांच्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. पट्टाभीपुरम पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.