
चंद्रपूरमध्ये एका सावकाराने कर्जाचा परतावा मिळविण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथुर गावात हा प्रकार घडला. रोशन सदाशिव कुडे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. कुडे यांनी केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी हे प्रकरण युद्धपातळीवर तपासासाठी घेतले असून, या प्रकरणातील सर्व सहा आरोपी सावकारांवर सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
यातच सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथुर येथील शेतकरी रोशन कुडे यांच्या वडिलांनी त्यांचा मुलगा सावकारी पाशात कसा फसत गेला? अखेर त्याला आपली किडनी का विकावी लागली? याची करूण कथा सांगितली आहे. कोरोना काळात डबघाईला आलेला दुधाचा व्यवसाय आणि त्यानंतर आलेल्या लंपी आजारामुळे रोशनकुडे सावकाराकडून घेतलेले अवघे एक लाख रुपये फेडू शकले नाही. मात्र दुसरीकडे सावकार त्याला पद्धतशीर आपल्या जाळ्यात उडकवत राहिले. व्याजावर व्याज चढवत लाखो रुपयांची रक्कम त्याच्याकडून लाटली आणि अखेर त्याला किडनी विकण्यास भाग पाडलं, अशी व्यथा शिवदास कुडे यांनी मांडली आहे.






























































