शेतकऱ्यां ना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्याच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा! कॉँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्रात मागील तीन-चार दिवसांत मुसळधार पावसाने अनेक भागांत पूरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱयांना हेक्टरी 50 हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास 17 जिह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. उत्तर महाराष्ट्र व कोकणातही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.  ज्वारी, बाजरी, उडीद, मका, सोयाबीन, मूग, कापूस, तूर, फळे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास 15 लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समजते. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱयांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अटी व शर्ती बाजूला ठेवून मदत करा

राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र या कठीण प्रसंगी सर्व नियम, अटी व शर्ती बाजूला ठेवून शेतकऱयांची मदत केली पाहिजे. जेथे जीवितहानी झाली आहे त्यांच्या कुटुंबीयांचा सहानुभूतीपूर्ण विचार करून मदत करावी, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.