
सामना प्रतिनिधी । भूम
भूम तालुक्याची सध्याची चुकीची आणेवारी रद्द करून लवकरात लवकर दुसरी आणेवारी जाहीर करावी. तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
यावर्षी जिल्ह्यासह तालुक्यात सरासरी पेक्षा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होऊनही पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांची खरीप पिके पूर्णतः वाया गेली आहेत. तर रब्बी पिकांची कसलीच शाश्वती राहिलेली नाही. यामुळे तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटाच्या दृष्टचक्रात सापडला आहे. दरम्यान यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. खरिप पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सातत्याने अडचणीत येत असल्याने तालुक्यातील शेतकरी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या मानसिकतेत असल्याने शेतकऱ्यांना तातडीने शासनाच्या वतीने दिलासा देणे गरजेचे आहे. तर पशुधनासाठी चारा व पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. म्हणून शासनाने फेर आणेवारी करून शेतकऱ्याचे हीत जोपासत तालुका दुष्काळग्रस्त करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. जर शासनाने भूम तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. याची शासनाने गंभीर दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख सुरेश कांबळे, उपजिल्हाप्रमूख दत्ता मोहीते, माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप शाळू, अॅड. रविंद्र गुळवे, पंचायत समिती सदस्य बालाजी गुंजाळ, रामचंद्र शेळके, दत्तात्रय काळे, सतिश मोटे, शिवशकर सोलापूरे, बाळासाहेब औताडे, चेअरमन सतिश मोटे, काकासाहेब मारकड, महेश बोराडे, राजकुमार नाईकनवरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.


































































