
अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी यातील काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला बोल केला आहे. केंद्र सरकारने 1975 मध्ये लागू केलेल्या आणीबाणीच्या 50 व्या वर्षानिमित्त ‘संविधान हत्या दिवस’ साजरा करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत. यावरच भाष्य करताना मुंबईतीत दादर येते वेगवेगळ्या कामगार संघटनांच्या संयुक्त मेळाव्यात बोलताना ते असं म्हणाले, असं वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’ने दिलं आहे.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “आणीबाणी होती आणि इंदिरा गांधींना दोष दिला. हे सर्व खरं आहे, पण पराभव झाल्यावर इंदिरा गांधींनी देशाची क्षमा मागितली ही गोष्ट विसरता कामा नये. नंतरच्या काळात पुन्हा जनतेने त्यांना संधी दिली. चित्र बदललं होतं. आता पुन्हा एकदा सावध राहण्याचा काळ आहे.”
ते पुढे म्हणाले की, ” जे वृत्तपत्रात काम करतात, त्यांना माहीत असेल. बाकीच्यांना माहीत नाही. आज वृत्तपत्र आपलं मत स्वच्छ मांडतंय. जे वृत्तपत्र त्यांचं मत स्वच्छ मांडत असेल आणि ते सरकारच्या विरोधी असेल तर त्या वृत्तपत्राला, त्या पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून फोन येतात. त्यांना सांगण्यात येतं की ही बातमी अशी छापू नका. एका प्रकारची धमकी पत्रकारांनाही दिली जात आहे.”































































