दीपक केसरकर एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन गेले, संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना अशोक खरात बदल्या, बढत्या आणि टेंडर ठरवायचा असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच दीपक केसरकर एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन गेले असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी सरकारने उत्तर दिलं पाहिजे. कारण खरात सरकारी माणूस आहे. ज्याच्या पाठीशी 40 आमदार आहे, खासदार आहे आणि महिला आयोग आहे. अगदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. अशा महान महात्म्यावरती आम्ही काय उत्तर देणार?

तसेच सरकार जर अशोक खराच्या मागे नसतं तर हे 40 आमदार, खासदार, मंत्री जे तिथे सेवा करायला जात होते त्यांची यादी सरकारने जाहीर केली असती. भोंदू बाबापेक्षा भोंदू बाबाला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक गुन्हेगार असतात. भोंदू बाबा तर आहेच पण त्या भोंदू बाबाच्या चरणाशी जाऊन सेवा करणारे, विधी करणाऱ्या राज्यकर्त्यांना अधिक अपराधी मानायला पाहिजे. त्यामुळे अशा सगळ्यांची यादी जाहीर व्हायला पाहिजे. तुम्ही इतर गुन्ह्यांमध्ये सहआरोपींची नाव देता, त्यांना अटक करता, त्यांना चौकशीला बोलवता. इथे दीपक केसरकर, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांना चौकशीसाठी बोलावलं का? यांना विचारा की तिथे का गेला होतात? तुम्ही कोणते विधी केलेत, त्यातून तुम्हाला काय फायदा झाला, तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत, पैसे कुठून आणलेत? पोलिसांना जर प्रश्न विचारण्यात अडचण असेल तर मी त्यांना प्रश्नावली तयार करून देतो. प्रश्न विचारला पाहिजे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं? चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला? फोटो कोणीही कोणाबरोबर काढू शकतो असं मुख्यमंत्री म्हणतात. मी मुख्यमंत्र्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. तरीही माझा प्रश्न आहे की, अशोक खरात सारखा भोंदू बाबा राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोहोचला? कोणीतरी मध्यस्थ आहे, कोणीतरी दलाल आहे जे या सरकारमध्ये सत्तेमध्ये भोंदू बाबाला प्रतिष्ठा देत होते. अशोक खरात मंत्रालयामध्ये कसा पोहोचतो? अशोक खरात अनेक मंत्र्यांच्या कामात कसा हस्तक्षेप करू शकत होता? याबाबत आम्हाला माहिती द्या. हा तपास आता फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेशी संदर्भात आहे असे संजय राऊत म्हणाले.

अशोक खरातला महाविकास आघाडीकडून फायदा झाला या आरोपावर संजय राऊत म्हणाले की, साधारणतः गेल्या वर्षभरात हे गुन्हे घडले आहेत. आता गवत कोणी लावलं? पाणी कोणी दिलं? हे काय प्रश्न नाहीयेत. मुळ प्रश्न हा आहे की, तिथे अशा प्रकारे जाऊन गेल्या दोन वर्षांमध्ये कोणते मंत्री, कोणते आमदार, कोणते खासदार त्या बुवाबाजीला प्रतिष्ठा देत होते? महाविकास आघाडीच्या काळामध्ये काय झालं, काय नाही या संदर्भात उघड आहे. तुम्ही पाणी दिलं असं म्हणताय, एखाद्या संस्थेला पाणी देणं गुन्हा आहे का ? अनेक वेळेला रजिस्टर असलेल्या अनेक संस्थांना आताही पाणी दिलं, पूर्वी पाणी दिले असेल. पण विषय तो नाहीये. तुम्ही विषयांतर करू नका. या बाबतीत माझा प्रश्न आणि माझे उत्तर अत्यंत शार्प आहेत. माझं म्हणणं की, महिलांचे शोषण हा सगळ्यात गंभीर गुन्हा आहे. महिलांचे शोषण, ब्लॅकमेलिंग, धमक्या हा पहिला क्रमांकाचा गुन्हा आहे. त्यानंतर हे गुन्हे दडपण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न हा त्याहीपेक्षा भयंकर गुन्हा आहे, याच्यावरच चर्चा व्हायला हवी असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

दीपक केसरकरांचा अशोक खरातशी जो संबंध आहे, तो जग जाहीर आहे आणि याबद्दल मीच बोलतोय का? असे संजय राऊत म्हणाले याबाबत अख्खं जग बोलतंय. केसरकर आणि खरात यांचे व्हिडिओ आणि फोटो आहेत. ते स्वतःच कबूल करतायत की हो खरातचे आणि माझे घरचे संबंध होते म्हणून. खरातचं भविष्य खरं ठरत होतं हे स्वतः केसरकर सांगत होते.केसरकरांवर त्या भोंदू बाबाने काहीतरी जादू टोणा केलेला दिसतोय असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

सावंतवाडीत मोती तलावर खूप डोमकावळे फडफडतात, केसरकर त्यातलेच तो एक डोम कावळा आहे. केसरकरांविरुद्ध पुरावे आहेत, केसरकर त्या अशोक खरातचे सगळ्यात मोठे हस्तक होते, हे सगळ्यांना माहिती आहे. अनेक मंत्र्यांना आमदारांना केसरकर त्याच्याकडे घेऊन गेलेत. एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन जाणारे हेच दीपक केसरकर आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

अशोक खरातचा हस्तक्षेप सर्वत्र होता. केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्यामधल्या बदल्या, बढत्या, टेंडर हे सगळं अशोक खरात ठरवायचा. याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. महान शिक्षण तज्ञ, महर्षी अशोक खरात ट्रायडेंट हॉटेलमध्ये बसून हा सगळा कारभार करत होते असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.