वडील ब्रिगेडीयर होते, भाऊ कारगिलमध्ये शहीद झाला; कोझिकोडेतील विमान अपघातात वैमानिक दीपक साठेंचा दुर्दैवी मृत्यू

1147

केरळमधील कोझिकोड इथे झालेल्या विमान अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुख्य वैमानिक दीपक साठे आणि त्यांचा सहकारी अखिलेश कुमार यांचाही समावेश आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्घटना झाली होती.

kozikode-plane-accident

हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी या दुर्घटनेबद्दल बोलताना सांगितले की ‘हे विमान वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईवरून 190 प्रवाशांना घेऊन आलं होतं. पठारावर असलेल्या धावपट्टीवर उतरल्यानंतर वैमानिकांनी विमान थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र पावसामुळे धावपट्टी घसरडी झाल्याने ते अपेक्षित जागेवर थांबले नाही. सुदैव हेच आहे की विमानाला आग लागली नाही.’

मुंबईचे पायलट दीपक साठे यांचा दुर्दैवी मृत्यू
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या दीपक साठे आणि अखिलेश कुमार हे देशातील सर्वोत्तम वैमानिकांपैकी एक होते. या दोघांनी विमान थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र नैसर्गिक परिस्थितीमुळे बहुधा ते शक्य झालं नाही.या अपघातग्रस्त विमानाचे सारथ्य मुंबईचे वैमानिक दीपक वसंत साठे करत होते. अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघातात मृत्यूमुखी पडलेले वैमानिक दीपक साठे
अपघातात मृत्यूमुखी पडलेले वैमानिक दीपक साठे

हवाईदल अधिकारी राहिलेले दीपक साठे हे कुशल लढाऊ वैमानिक होते. ते 1981 साली हवाई दलात वैमानिक म्हणून रुजू झाले. 2003 पर्यंत त्यांनी हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवा केली. 2003 मध्ये त्यांनी विंग कमांडर म्हणून सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते एअर इंडियामध्ये रुजू झाले होते.

दीपक साठे हे अत्यंक कुशल वैमानिक होते. एअरबस 310 आणि बोईंग 737 विमाने उडवण्याचे कसब असलेल्या देशातील मोजक्या वैमानिकांमध्ये त्यांचा समावेश होता. दीपक साठे यांचे वडील हे सैन्यदलात ब्रिगेडीअर होते. त्यांचा भाऊ हा देखील सैन्यात होता आणि कारगिल युद्धामध्ये तो शहीद झाला होता. साठे यांचं संपूर्ण कुटुंबच जणू देशसेवेसाठी समर्पित कुटुंब होतं. साठे हे हवाई दलात असताना त्यांना एअरफोर्स अकॅडेमीचा स्वोर्ड ऑफ ऑनर हा मानाचा किताबही मिळालेला होता.

आपली प्रतिक्रिया द्या