
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मुंबईकर घामाघुम झाले आहेत. उष्णतेमुळे मुंबईकर हैराण झाले असून डिहायड्रेशनने त्रासलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिवसाला आठ ते दहा रुग्ण ओपीडीमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी भरपूर पाणी पिणे आणि हायड्रेट राहणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी आवाहन केले आहे.
डिहायड्रेशनची समस्या सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये आढळून येऊ शकते. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांवर याचा गंभीर परिणाम होतो. अतिसार आणि उलट्या हे लहान मुलांमध्ये डिहायड्रेशनला कारणीभूत ठरतात. लहान मुलांमध्ये, तोंड कोरडे पडणे, जीभ तसेच डोळे कोरडे होणे, ऊर्जेची पातळी कमी होणे आणि सतत चिडचिड होणे अशी लक्षणे दिसून येतात. याउलट प्रौढांमध्ये लघवीचे प्रमाण कमी होणे, डोकेदुखी, गडद रंगाची लघवी, थकवा येणे आणि गरगरणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.
झायनोव्हा शाल्बी मल्टी-स्पेशालिटी रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. उर्वी महेश्वरी म्हणाल्या की, पावसाळ्यातही भरपूर पाणी पिणे तितकेच गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे (वाढलेली उष्णता) ओपीडीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी 8 ते 10 रुग्ण डिहायड्रेशनची समस्या घेऊन येत आहे. याशिवाय अनेकांना व्हायरल इन्फेक्शन, चक्कर येणे, उलट्या होणे याचा देखील त्रास होत आहे. अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील जनरल फिजिशियन डॉ. छाया वजा म्हणाल्या की, पावसाळ्यात हवामान खूप थंड असते पण आता तापमानात अचानक बदलल्यामुळे अनेकांना डिहायड्रेशन, चक्कर येणे, उलट्या होणे आणि व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होतो. अशा वातावरणात स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
शरीर हायड्रेटेड रहाण्याकरिता तुम्ही जिथे जाल तिथे पाण्याची बाटली सोबत ठेवा. तुमच्या आहारात द्रव पदार्थांचा समावेश करा. काकडी, कलिंगड, संत्री आणि स्ट्रॉबेरी यांसारखी फळे आणि भाज्यांमध्ये आहारात समावेश करा. याव्यतिरिक्त नारळ पाणी, ताक किंवा लिंबु सरबत हे देखील शरीराला हायड्रेट करण्यात मदत करतात.
























































