दिल्ली विधानसभा परिसरात कार घुसखोरी प्रकरण: एसयूव्ही चालकाला 8 दिवसांची पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली विधानसभा परिसराच्या सुरक्षिततेचे उल्लंघन करून आपली एसयूव्ही गाडी आत घुसवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या चालकाला दिल्ली न्यायालयाने मंगळवारी आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे विधानसभा परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सरबजीत सिंग याला मंगळवारी न्यायिक दंडाधिकारी कार्तिक तापारिया यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. तपासासाठी पोलिसांनी सुरुवातीला 10 दिवसांच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती, मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, 37 वर्षीय सरबजीत सिंग हा ‘किसान आंदोलनाचा’ समर्थक असल्याचे समजते. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून 2020-21 च्या शेतकरी आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या नेत्यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. विशेष म्हणजे, यातील काही वादग्रस्त मजकूर त्याने स्वतः किंवा मूळ पोस्टकर्त्यांनी नंतर हटवल्याचेही समोर आले आहे. पोलीस आता या घुसखोरीमागचा मुख्य हेतू आणि त्याचे इतर कोणाशी संबंध आहेत का, याचा सखोल तपास करत आहेत.