मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातून आतिशी यांचे सर्व सामान बाहेर काढल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांच्या खासगी निवासस्थानातून कामकाजाला सुरुवात केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचे सामान फेकून दिल्याचा तसेच कुठलीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप अतिशी यांनी केला आहे. दरम्यान, आतिशी यांनी त्यांच्या फेकलेल्या वस्तू खोक्यांमध्ये भरल्या असून त्या खोक्यांसह काम करत असल्याचा व्हिडीओs व्हायरल होत आहे.
सुडाचे राजकारण करत एनडीए सरकारने ‘आप’च्या नेत्यांवर, मंत्र्यांवर एकापाठोपाठ कारवाया सुरू केल्या आहेत. नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आतिशी यांचे सामान त्यांच्या शासकीय निवासस्थानातून बाहेर काढण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी त्या या निवासस्थानी राहण्यास आल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचे घर सील केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांच्या पथकाने बुधवारी फ्लॅगस्टाफ रोड, सिव्हिल लाईन्स येथील शिश महल या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि चाव्या ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे.
व्हायरल व्हिडीओत काय?
अतिशी या त्यांच्या खासगी निवासस्थानी बसल्या आहेत. फोनवर चर्चा करत आहे. त्या ज्या सोफ्यावर बसल्या आहेत त्या ठिकाणी आजूबाजूला खोकी ठेवण्यात आली आहेत.
अधिकृत पत्र नसल्याचे दिले कारण
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तीन आठवडय़ांनी शिश महल रिकामे करण्यात आले. मधल्या काळात आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे अतिशी या शासकीय निवासस्थानी स्थलांतरित होणार होत्या. त्यानुसार त्या स्थलांतरित झाल्याही, परंतु त्यांच्याकडे याबाबतचे अधिकृत पत्र नसल्याचे कारण देत सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई केली. दरम्यान, दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिलेल्या निर्देशावरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आतिशी यांनी केला आहे.