नोटबंदी म्हणजे दहशतवादी हल्ला- राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आज तीन वर्ष पूर्ण होत आहे. 8 नोव्हेबर 2016 साली रात्री 8 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. यावरुन माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. नोटबंदी हा दहशतवादी हल्लाच असून या निर्णयामुळे देशाची आर्थिक स्थिती खिळखिळी झाली आहे. असा आरोपच राहुल गांधी यांनी मोदींवर केला आहे.

नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. तर अनेक लहान उद्योग ठप्प झाले आहेत. या निर्णयामुळे अनेक दशलक्ष नागरिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळल्याचे गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. तसेच या क्रूर हल्ल्यामागे ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना कठोर शासन व्हायलाच हवे. अशी मागणीही गांधी यांनी केली आहे.

केंद्र सरकारने देशातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याबरोबरच देशाबाहेर गेलेला काळापैसा परत मायदेशी आणण्यासठी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र देशात नोटबंदी लागू होताच लहान मोठे उद्योग ठप्प झाले. अनेकजण बेरोजगार झाले. तर या काळात जुन्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्या होत्या. यामुळे बँकामधून नव्या नोटा मिळवताना सामान्य नागरिकांची पुरती दमछाक झाली होती. अनेक नागरिकांचा बँकांच्या रांगामध्ये उभे असतानाच मृत्यू झाला होता.