लेख : दिल्ली डायरी : केजरीवाल यांची अळीमिळी गुपचिळी

1529

>> नीलेश कुलकर्णी

एरवी दिल्लीच्या रस्त्यावरील झाडाची फांदी जरी तुटली तरी त्यासाठी नरेंद्र मोदींना ‘जबाबदार’ धरणारे ‘आप’चे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री सध्या शहाण्या मुलासारखे  गप्प बसले आहेत. याला अर्थातच दिल्ली विधानसभेची आगामी निवडणूक कारणीभूत आहे. केजरीवाल यांच्याबद्दल दिल्लीकरांना अजूनही सहानुभूती आहे. त्यात शीला दीक्षित यांचे निधन आणि दिल्ली भाजपमध्ये नेतृत्वासाठी चाललेली स्पर्धा केजरीवाल यांच्या पथ्यावरच पडणारी आहे. म्हणूनच मोदींवर आक्रस्ताळी टीका करून मध्यमवर्ग आणि तरुणांचा रोष पत्करण्यापेक्षा अळीमिळी गुपचिळी राहण्याचा मध्यममार्ग केजरीवाल यांनी स्वीकारला असावा.

दिल्ली आणि ‘आप’वाल्यांची भांडणे  एरवी नळावरच्या भांडणासारखी होत. त्यामुळे जनतेची फुकट करमणूकही व्हायची. मात्र केजरीवालांनी आपल्या राजकीय चालींप्रमाणेच स्वभावालाही  ‘यू टर्न’ कसा दिला, असा सवाल त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. ‘हसना मना है’ असे फर्मानच जणू आता या महाशयांनी काढले आहे. त्याला कारणीभूत आहे ती दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणूक. नरेंद्र मोदींना जनतेने प्रचंड बहुमताने सत्तेच्या सिंहासनावर पुन्हा एकदा बसवले आहे हे केजरीवालांनी बहुधा स्वतःपुरता तरी मोकळ्या मनाने स्वीकारले असावे. त्यामुळे यावेळी मोदी जातील तिथे मारुतीमागे शेपूट याप्रमाणे मोदींविरोधात निवडणूक लढविण्याची ‘नौटंकी’ केजरीवालांनी केली नाही. जनतेच्या मनात मोदींबद्दल अजूनही ‘फील गुड’ची भावना आहे. त्याचवेळी दिल्लीतही हीच भावना आपल्या बाबतीत आहे हे केजरीवालांनी अचूकपणे ओळखले आहे. शीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्लीतील काँग्रेस अनाथ झाली आहे तर भाजपमध्ये केजरीवाल यांना टक्कर देईल अशा ताकदीचा नेता दिल्लीत नाही. तेव्हा केंद्रात मोदी, दिल्लीत केजरीवाल, अशा वेळी मोदींवर आक्रस्ताळी टीका करून मध्यमवर्ग व नवतरुणांचा रोष पत्करण्यापेक्षा ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ या उक्तीचे पालन केजरीवाल करीत असावेत. त्यामुळे पत्रकार परिषदाच काय तर ट्विटरवरूनही केजरीवाल साधे ‘टिवटिव’ करताना दिसत नाहीत. बाकी केजरीवालांच्या या ‘अळीमिळी गुपचिळी’मुळे मीडियाची ‘ब्रेकिंग न्यूज’ची बोंब झाली असली तरी हे मौन केजरीवालांना राजकीयदृष्टय़ा लाभदायक ठरेल असे वातावरण आहे.

दिल्लीत सध्या संत रविदास मंदिर पाडल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भीम आर्मीचा नेता चंद्रशेखर याविरोधात मैदानात उतरला आहे. चंद्रशेखरला ‘हवा’ दिली तर मायावतींचा बसपा आणि केजरीवालांचा आप, दोघांनाही फटका बसेल हा भाजपचा हिशेब आहे. बाकी केजरीवाल राजकीय नौटंकीत पीएच.डी. असले तरी गोरगरीबांना पुरेशी वीज आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्यामुळेच झोपडपट्टी आणि गरीब वर्गात अजूनही केजरीवालांची क्रेझ आहे.  सर्वतोपरी प्रयत्न करूनही भाजपला ही क्रेझ काही कमी करता आलेली नाही. आता चंद्रशेखरच्या आंदोलनाला ‘हवा’ देऊन काय व कितपत साध्य होईल हाही प्रश्नच आहे. आरोग्य व शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत केजरीवाल सरकारची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्यातच दिल्लीतले भाजप नेते केवळ विरोधाला विरोध करत असल्यामुळे केजरीवालांबद्दल दिल्लीकरांच्या मनात सहानुभूती आहे. ‘उपर मोदी, नीचे केजरीवाल’ हे दिल्लीकरांच्या मनातले सूत्र अजूनही दिल्लीतील भाजप नेत्यांना तोडता आलेले नाही. त्यात केजरीवालांनी नौटंकी आणि आरडाओरड या मूळ स्वभावाला मुरड घालत गंभीरपणे काम करायला सुरुवात केली असल्यामुळे भाजपची गोची झाली आहे. पुन्हा शीला दीक्षितांच्या निधनामुळे काँग्रेसमध्ये केजरीवालांचा मुकाबला करू शकेल असा सक्षम नेता नाही, तर भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी आणि विजय गोयल यांच्यातून आडवा विस्तव जात नाही. परिस्थिती अशी अनुकूल असल्यामुळेच केजरीवालांनी ‘सविनया’चा मार्ग पकडला आहे. केजरीवालांमधला बदल हा सर्वांसाठी आश्चर्यकारक आहे, मात्र ज्या केजरीवालांनी गळ्यातली मफलर खोकल्यासकट सोडली, मेट्रोने ऑफिसला जाण्याची ‘नौटंकी’ एका दिवसात समाप्त केली ते पाहता केजरीवाल ही मौनाची नौटंकीही निवडणुकीचा निकाल येईपर्यंत तरी यशस्वी करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

मनमोहन इज बॅक

manmohan-singhहिंदुस्थानच्या राजकारणात सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उडालेली असताना एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेत परतले. आसाममधील काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर मनमोहन सिंग यांना राज्यसभेत कुठून पाठवणार? असा प्रश्न हायकमांडच्या मनात निर्माण झाला होता. भाजपचे राजस्थानातील सदस्य मदनलाल सैनी यांचे अकस्मात निधन झाले आणि त्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीत मनमोहन सिंग यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा मनाचा मोठेपणा भाजपने दाखवला. त्यातूनच मनमोहन यांचा राज्यसभेचा मार्ग प्रशस्त झाला. भाजप नेहमीच कोत्या मनोवृत्तीचे राजकारण करते ही विरोधकांची टीका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यावेळी खोटी ठरवली व चांगला पायंडा पाडला. मनमोहन सिंग यांना पुन्हा सहाव्यांदा राज्यसभेत कशासाठी? असा सवाल काही जणांच्या मनात निर्माण होणे अपेक्षित आहे, मात्र त्यांच्यासारखी माणसे सभागृहाची उंची वाढवत असतात. आजही मनमोहन सिंग यांच्याशिवाय नव्वदीच्या क्लबमध्ये गेलेले मोतीलाल व्होरा, ऍड. राम जेठमलानी ही ज्येष्ठ मंडळी सभागृहात 11 च्या ठोक्याला न चुकता हजर असतात, कामाप्रति समर्पित असतात. त्यांचा उत्साह आणि निष्ठा ही वाखाणण्याजोगी आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला सध्या कापरे फुटलेले असताना तर सरकारचे कान पकडण्याचा अधिकार असणारा मनमोहन सिंग यांच्यासारखा अर्थतज्ञ सभागृहात असणे गरजेचेच होते. मनमोहन निरोप देताना राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू त्यावेळी भावुक झाले होते. मनमोहन सिंगांसारखी माणसे देशासाठी महत्त्वाची असतात. त्यांची उणीव भासेल, असे उद्गार त्यांनी काढले होते. आता मनमोहन सिंगांनी जोरदार ‘कम बॅक’ केले आहे. बघूयात अर्थव्यवस्थेचे कम बॅक कधी होते ते!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या