
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
‘तेलही गेले तूपही गेले हाती धुपाटणे आले’, अशी राजकीय अवस्था झालेल्या बसपा सुप्रिमो मायावती समाजवादी सुप्रिमो अखिलेश यादव यांना झोडपत आहेत. मायावती विधानसभा निवडणुकीत भाजपला ‘मॅनेज’ होत्या, त्या बदल्यात आता त्या राष्ट्रपती होतील, अशी खोचक टीका अखिलेश यांनी केली होती. ‘मी एक वेळ मुख्यमंत्री, पंतप्रधान होईन, पण राष्ट्रपती पदाचा विचारही मनात आणू शकत नाही. माझी फिकीर करण्याऐवजी अखिलेश यांनी स्वतःची फिकीर करावी,’ असा प्रतिटोला मायावतींनी अखिलेश यांना लगावला आहे. अखिलेश यांचा घाव त्यांच्या वर्मी लागला आहे खरा. मात्र त्यातून काहीच हशील होणार नाही. राष्ट्रपती पद सोडा, राजकीय स्वार्थ साधल्यानंतर भाजप मायावतींना हिंग लावूनही विचारणार नाही. ‘मायावतींचे अरण्यरुदन’ त्यामुळेच वेदनादायी आहे.
भाजपने उत्तर प्रदेश सलग दुसऱयांदा विक्रमी मताधिक्क्याने जिंकल्यानंतर बसपा व सपा हे दोन्ही पक्ष या पराभवाचा गांभीर्याने विचार करून पुन्हा नव्याने राजकीय पाळेमुळे मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा होती. मात्र राजकीय निकालानंतर उभय पक्षांत उखाळ्यापाखाळ्यांनाच ऊत आला आहे. अर्थात यामुळे भाजपचे आयतेच फावणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मायावतींची पूर्ण व्होटबँक भाजपला समर्पित झाली. त्या प्रचारालाही बाहेर पडल्या नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये काही वर्षांपूर्वी डॅशिंग मुलीला, ‘खुद को मायावती समझती है क्या?’ असे विचारले जायचे. मायावती नावाची एका सामान्य दलित कुटुंबातली मुलगी दिल्लीत आयएएस होण्याचे स्वप्न घेऊन आली, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पुण्यातली नोकरी सोडून कांशीराम उत्तर प्रदेशात बसपाची पाळेमुळे रोवत असताना मायावतींच्या रूपाने त्यांना पक्षासाठी ‘चेहरा’ मिळाला. त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. उत्तर प्रदेशच्या इतिहासात सर्वात चांगली कायदा-सुव्यवस्था राखणाऱया मुख्यमंत्री म्हणून मायावती यांचा लौकीक झाला. पण नोकरशाहीला चळाचळा कापायला लावणाऱया ‘डेअरडेव्हिल’ मायावतींची भाजपच्या तपास यंत्रणांनी पार ‘गोगलगाय’ केल्याचे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिसून आले. मायावतींना घरात बसून राहण्याची जबाबदारी देण्यात आली. एकेकाळी उत्तर प्रदेशसह उत्तरेच्या पट्टय़ात कमालीचा प्रभाव दाखविणाऱया मायावती पंतप्रधानही बनतील, असे चित्र होते. मात्र राजकीय प्रवाहात मायावती मागे पडत गेल्या. भ्रष्टाचाराच्या आरोपाने मेटाकुटीला आल्या. बसपाचे केडर खिळखिळे होत असताना मायावतींनी फक्त स्वतःपुरता विचार केला. त्याची परिणती आज समोर आहे. उत्तर प्रदेशमध्ये मायावतींकडची ब्राह्मण व दलित व्होटबँक भाजपकडे ‘शिफ्ट’ झाल्याने समाजवादी पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागले. उत्तर प्रदेशमध्ये शांत बसण्याची बक्षिसी मायावतींना राष्ट्रपती पदाच्या रूपाने दिली जाईल, असे बोलले जात होते. मात्र त्याला आता दस्तरखुद्द बहेनजींनीच नाकारले आहे. यापुढे उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान होणे हे मायावतींसाठी स्वप्नच ठरणार आहे. मायावतींनी ज्या आक्रमकपणे अखिलेश यांना फटकारले त्यातून त्यांची अगतिकता दिसून येते. अखिलेश यांचा घाव त्यांच्या वर्मी लागला आहे खरा. मात्र त्यातून काहीच हशील होणार नाही. राष्ट्रपती पद सोडा, राजकीय स्वार्थ साधल्यानंतर भाजप मायावतींना हिंग लावूनही विचारणार नाही. ‘मायावतींचे अरण्यरुदन’ त्यामुळेच वेदनादायी आहे.
आयाराम आणि गयाराम!
हरयाणा काँगेसच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांचे समर्थक उदयभान यांची निवड झाली. आता तुम्ही म्हणाल यात नवलविशेष ते काय? मात्र उदयभान नावाचे जे महाशय प्रदेशाध्यक्ष बनले आहेत त्यांच्या पाठीशी एक मनोरंजक असा राजकीय वारसा आहे. उदयभान यांचे वडील गयालाल 1967मध्ये अपक्ष आमदार म्हणून हरयाणात निवडून आले. त्यांच्या सोबतीला 15 अपक्ष आमदार होते. संयुक्त मोर्चा व काँगेस या दोन्ही पक्षांनी सरकार स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. गयालाल यांनी एकाच दिवशी तीन वेळा पक्षांतर करण्याचा विश्वविक्रम त्याच वेळी नोंदवला. सकाळी काँगेसमध्ये असलेले गयालाल दुपारी संयुक्त मोर्चात दाखल झाले तर दिवस मावळतीला लागल्यानंतर त्यांचे अचानक हृदयपरिवर्तन वगैरे झाले आणि ते काँगेसवासी झाले. सायंकाळी गयालाल यांना गळाला लावल्यानंतर तत्कालीन काँगेस नेते राव वीरेंद्रसिंग यांनी चंदीगडमध्ये पत्रकार परिषद घेत, ‘जो गया राम थे वो अब आया राम हो गये है’ अशी मिश्कील टिप्पणी केली होती. त्यानंतर हरयाणा आणि एकंदरीत देशातीलच आमदारांच्या पळवापळवीला व राजकीय सर्कशीला आयाराम गयाराम हे नामाभिधान प्राप्त झाले. अशा गयालाल यांचे सुपुत्र उदयभान काँगेसला हरयाणात अच्छे दिन दाखवतील काय, हा खरा प्रश्न आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची खुर्ची वास्तविक हुड्डा यांनाच खुणावत होती. मात्र काँगेस अंतर्गत प्रचंड विरोध झाल्याने तसेच दलित नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचे हायकमांडने ठरविल्याने उदयभान यांची लॉटरी लागली. उदयभान यांनी आपल्या पिताजींची आयाराम गयाराम संस्कृती बाजूला ठेवून काम केले तरच काँगेसचे भले होईल.
अजब न्याय वर्तुळाचा!
मध्य प्रदेश विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून कमलनाथ यांची उचलबांगडी करून काँगेस हायकमांडने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वास्तविक, कमलनाथ हे ‘दस जनपथ’चे खासमखास. माजी मुख्यमंत्री. मात्र तरीही सोनिया गांधी यांनी धाडसाने निर्णय घेत कमलनाथ यांची खुर्ची डॉ. गोविंदसिंग यांना दिली आहे. गोविंदसिंग मध्य प्रदेशबाहेर फारसे परिचित नसले तरी त्या राज्यात चांगलेच लोकप्रिय आहेत. सलग 35 वर्षे आमदार असणारे गोविंदसिंग तुलनेने निस्पृह गृहस्थ आहेत. प्रसंगी ते दबंग नेते आहेत. कार्यकर्त्यांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा हा नेता आहे. 35 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत ते मंत्रीही होते. मात्र अंगावर शिंतोडा पडावा असे कोणतेही काम गोविंद सिंग यांनी केलेले नाही. अर्जुनसिंग, दिग्विजयसिंग व कमलनाथ या रथीमहारथींच्या राजकीय धुमश्चक्रीमध्ये गोविंद सिंग हे कायमच दुर्लक्षित राहिले. 35 वर्षांनंतर हायकमांडला अचानक गोविंद सिंग यांची आठवण आली याचे कारण म्हणजे खिळखिळे झालेले चंबळचे खोरे. ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपने गळाला लावल्यापासून चंबळच्या खोऱयात काँगेसची दुरवस्था झाली आहे. या भागात काँगेस मजबुतीने उभी राहायची असेल तर गोविंद सिंग यांच्यासारख्या समर्पित नेत्याला ताकद देण्याची गरज आहे, ही उपरती उशिरा का होईना काँगेस नेत्यांना झाली. गोविंदसिंग यांनी आजवर दिलेल्या जबाबदाऱया यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. भाजपचा दबदबा वाढलेला असताना गोविंदसिंग विधानसभेत कशा पद्धतीने काम करतात, याकडे सर्वांचेच लक्ष असेल. पस्तीस वर्षांनंतर एखाद्या नेत्याला न्याय मिळतो, याचे अनोखे उदाहरण गोविंद सिंग यांच्या रूपाने पुढे आले आहे. राजकारणातही ‘अजब न्याय वर्तुळा’चा असतो हेच खरे!






























































