दिल्ली डायरी- उत्तर प्रदेशमधील अविश्वासाचा ‘कचरा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीलेश कुलकर्णी  <[email protected]>>

देशभरात पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छता अभियानाचे ढोल भाजपवाले पिटत आहेत. मात्र त्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना उत्तर प्रदेशमधील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी उतरल्यावर नाकाला रुमाल लावण्याची वेळ आली. मुख्यमंत्री योगी सोबत असतानाही हे घडले. ज्या राज्याने या पक्षाला २०१४मध्ये तब्बल ७१ खासदारांचे बळ दिले, विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता दिली त्याच राज्यात  सध्या सत्ताधारी भाजपमध्ये परस्परांच्या मनात ‘अविश्वासाचा कचरा’ भरला आहे. त्याचा प्रत्ययच अमित शहा यांना आला, असे मानायचे का?

भाजप अध्यक्ष अमित शहा हे मॅनेजमेंट गुरू मानले जातात. त्यामुळे कोणतीही गोष्ट असो ती अमितभाईंना नीटनेटकीच हवी. मात्र हल्ली त्यांचे मॅनेजमेंट तंत्र उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांनी फेल केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपमधील आणखी एक मॅनेजमेंट गुरू ओमप्रकाश माथूर सध्या भाजप नेतृत्वावर कमालीचे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात अमितभाई मेहनत घेत असताना प्रभारी असूनही माथूरांनी त्यांच्यापासून ‘सुरक्षित अंतर’ राखले आहे. त्याला राजकीय वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले आहे.

देशाला सर्वाधिक खासदार देणाऱया उत्तर प्रदेशमध्ये भाजपमध्ये उघडपणे दुफळी दिसून येत आहे. अमित शहा, सुनील बन्सल व भूपेंद्र यादव विरुद्ध ओ. पी. माथूर, योगी यांचा गट यांच्यात राजकीय धुमश्चक्री सुरू आहे. माथूर यांची उत्तर प्रदेशाबाहेर उचलबांगडी करण्याचा अमित शहा यांचा निश्चय आहे, तर योगींनी सुनील बन्सलांना यूपीबाहेर काढण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेली भाजप उत्तर प्रदेशमध्ये पूर्णपणे विखुरली गेल्याचे चित्र आहे.

अमित शहा यांनी नुकतीच योगींसोबत उत्तर प्रदेशातील एका व्यापारी केंद्राला भेट दिली. त्यावेळी तिथे पडलेला कचरा पाहून अमितभाई कार्यकर्त्यांवर भयंकर संतापले. वास्तविक मुख्यमंत्री सोबतीला असताना प्रशासनाने संपूर्ण खबरदारी घ्यायला हवी होती, मात्र अमित शहा गाडीतून उतरताच त्यांना नाकाला रुमाल लावावा लागला. त्यांनी कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली. अर्थात देशभरात स्वच्छ भारत अभियानचे ढोल कितीही वाजवले जात असले तरी आपली गावे काही स्मार्ट सिटी होताना दिसत नाही हे वास्तव सत्ताधीशांना यानिमित्ताने कळले. इतके होऊनही कार्यकर्त्यांनी कचरा दूर केलाच नाही. शहा यांच्या सिक्युरिटीतील जवानांनी तो बाजूला सारला. पक्षाध्यक्ष येत असतानाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कार्यक्रमाचे योग्य नियोजन का केले नाही, असा सवाल आता केला जात आहे आणि त्याला शहा-योगी वादाची किनारही आहे. रस्त्यावरचा कचरा कालांतराने उचललाही जाईल, पण परस्परांबद्दल मनात असलेला अविश्वासाचा कचरा ही मंडळी कसा दूर करणार हा प्रश्न आहे. हा कचरा वेळेत दूर केला नाही तर ७१ खासदार देणाऱया उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा ‘कचरा’ अटळ आहे.