
>> नीलेश कुलकर्णी ([email protected])
मौनी अमावस्येला अविमुत्तेश्वरानंद गंगास्नानाला जात असताना त्यांना पालखीने जाण्यास मज्जाव करून भक्तगणांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या लाठीमाराने तेथील राजकारण ढवळून निघाले आहे. पवित्र मणिकर्णिका घाटावर हातोडा चालवणाऱ्या सरकारविरोधात अगोदरच हिंदूंमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असताना शंकराचार्यांना आव्हान देत योगींनी स्वतःसह भाजपच्या पायावर धोंडा मारल्याचे मानले जात आहे. योगी यांच्याविरुद्ध सगळा संतसमाज एकवटला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरुद्ध सगळे अशी सध्या उत्तर प्रदेशमध्ये लढाई चालू असून त्याला दिल्लीची फूस असल्याचे मानले जात आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यापासून त्यांच्या ठाकूरधार्जिण्या राजकारणामुळे केवळ समाजकारण आणि राजकारणातच नव्हे तर धर्मकारणातही प्रचंड असंतोष आहे. योगींच्या या अडेलतट्टूपणाला वेसण घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सचिव राहिलेल्या ए.के. शर्मा यांना मंत्रिमंडळात पाठवले मात्र योगींनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. त्यानंतरच्या काळामध्ये केशवप्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक या दोन उपमुख्यमंत्र्यांकडे योगींना ‘कंट्रोल’ करण्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र त्यातही दिल्लीला अपयश आले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांना प्रदेशाध्यक्ष बनवून योगींना निपटण्याचा डाव नुकताच टाकण्यात आला आहे. योगी विरुद्ध अविमुत्तेश्वरानंद या प्रकरणात योगी यांच्या विरोधात थेट भूमिका घेऊन उपमुख्यमंत्री केशवप्रसाद यांनी रणशिंग फुंकले आहे. मोदींनंतर कोण, हा मोठा प्रश्न सध्या भाजपमध्ये विचारला जात आहे. अशा वेळी योगी आदित्यनाथ यांच्या कथित हिंदुत्ववादी प्रतिमेला एक्सपोज करण्याचा डाव दिल्लीने टाकला आणि त्यात योगींच्या ठाकूरधार्जिण्या हिंदुत्वाचा पंचा अडकला आहे. नितीन नवीन यांनी भाजपाध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली त्या कार्यक्रमात योगीही उपस्थित होते. मात्र त्यांना मागच्या रांगेत प्लॅस्टिक खुर्चीवर बसवण्यात आले. तसेच पंतप्रधान मंचावर आलेले असताना योगी यांनी त्यांना साधे हातदेखील जोडले नाहीत. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्यातून मोदी विरुद्ध योगी यांच्यातील संघर्ष तसेच योगींचे भाजपमधील स्थान दिसून येते. योगी यांना कोंडीत पकडून त्यांची विकेट घेण्याचा अमित शहा यांचा मास्टरप्लॅन असल्याचे सांगण्यात येते. अर्थात योगींची आडमुठी भूमिकाही त्यांच्या कोंडीला जबाबदार आहे. योगी आदित्यनाथ हे सकल हिंदूंना एकत्र एकसंध करतील अशी संघ परिवाराची अपेक्षा होती, मात्र योगींच्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशमधला हिंदू कधी नव्हे इतका जातीपातींमध्ये विभागला गेला आहे आणि त्याचे भयंकर परिणाम भाजपला 2029च्या लोकसभा निवडणुकीतही भोगावे लागतील. अर्थात आता याची जाणीव झाल्यामुळे योगींची उचलबांगडी करण्याची मोहीम सुरू आहे. योगी यांनी शंकराचार्यांच्या प्रतिष्ठेलाच आव्हान दिले आहे. योगींचे वर्तनही योगीसारखे राहिलेले नाही. योगी फक्त एका जात समूहाचे नेते असल्यासारखे वर्तन करत आहेत हे दुर्दैवी आहे. माघी स्नानाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादात योगींच्या राजसत्तेच्या नौकेला जलसमाधी देण्याचा भाजपच्या वरच्या स्तरावरून प्रयत्न सुरू आहे. हिंदू धर्मातील ‘कालनेमी’ कोण? यावरून योगी व अविमुत्तेश्वरानंद भिडले आहेत. भाजपच्या हिंदुत्वाचा बुरखा यानिमित्ताने फाटला आहे हेच खरे.
नितीन नही, ‘नितीनजी’ बोलो!
भाजपचे नवेकोरे अध्यक्ष नितीन नवीन यांचे नाव जनसामान्यांना माहिती असण्याचे कारण नाही. मात्र कोणालाही माहिती नसणाऱ्या लोकांना ‘हुडकून’ सर्वोच्च पदावर बसवण्याचा मोदी-शहा जोडीचा ‘इतिहास’ आहे. मनोहरलाल खट्टर नावाचे गृहस्थ अशाच पद्धतीने दिल्लीकरांनी हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवले होते. नितीन नवीन हे अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसले खरे, मात्र खरी अडचण इथूनच सुरू झालीये. आता 45 वर्षांच्या तरुण अध्यक्षाला त्यांच्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असणारे नेते नवीन अशा एकेरी नावाने संबोधू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नवीन अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना ‘आज से नितीन मेरे बॉस है’ असे सांगितले खरे, मात्र या समारोहानंतर पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी बाहेर आलेले नितीन नवीन कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये येत असल्याचे पाहताच मोदींनी त्यांना कोपऱ्यात ढकलल्याचे सर्वांनीच पाहिले. यावरून भाजप अध्यक्षाची मोदींच्या राज्यात किती ‘पत’ आणि वजन आहे, हे लक्षात यावे! आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सर्मा यांनी तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ‘नितीन चुनाव लडा था क्या?’ असे संभाषण आपापसात केले. त्यानंतर ‘रबर स्टॅम्प’ असले तरी नवीन यांना भाजपतली सगळीच मंडळी किरकोळीत काढतील म्हणून भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातून एक फर्मान काढण्यात आलेले आहे ते असे की, ‘नितीन मत बोलो, नितीनजी बोलो!’ आता वयाने 45 वर्षांच्या नितीन यांना त्यांच्या नावापुढे ‘जी’ लावत व ‘जीजी’ करण्याची वेळ भाजपतल्या वरिष्ठांवर आलेली आहे!
शत्रुजीत यांचे ‘हित’
पुरणकुमार यांच्या आत्महत्या प्रकरणात पुरण यांच्या सुसाईड नोटमध्ये नाव असलेले तत्कालीन पोलीस महासंचालक शत्रुजीत कपूर यांच्यावर हरयाणातील भाजप सरकार मेहरबान झालेले आहे. पुरणकुमार प्रकरणात त्यांच्यावर कुठली कारवाई होणे तर दूरच उलट शत्रुजीत यांचे करीअर संपेल असे वाटत असतानाच सरकारने त्यांना अर्ध सैन्य दलाचा प्रमुख नेमून शाबासकीच दिली आहे. शत्रुजीत कपूर यांना आयटीबीपीचे प्रमुख बनवून भाजप सरकारने पुरणकुमार यांच्या कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पुरणकुमार यांनी आत्महत्या करताना शत्रूजीत कपूर यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला होता. त्या वेळी शत्रुजीत हरयाणाचे पोलीस महासंचालक होते. शत्रुजीत हे हरयाणाचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री मनोहरलाल कट्टर यांचे अत्यंत निकटस्थ मानले जातात. त्याचबरोबर ते अमित शहा यांच्यादेखील ‘गुड बुक’मध्ये आहेत. इतर राज्यांतील निवडणुकांसाठी हरयाणातून मोठा पैसा पुरवण्यात आला. त्यात या शत्रुजीत यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जाते. अमित शहा यांच्यासारखा ‘गॉड फादर’ पाठीशी आहे. त्यामुळे शत्रुजीत यांना शिक्षा व्हायची काय बिशाद? हरयाणातील लोकभावना आणि प्रशासनातील विरोध डावलून शत्रुजीत यांचे व्यवस्थित पुनर्वसन करण्यात आलेले आहे. शत्रुजीत यांचे ‘हित’ सरकारने जोपासले आहे.























































