
‘आप’चे महरौली येथून निवडून आलेले आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री उशिरा हल्ला झाला. गोळीबारात एका कार्यकर्त्याचा मृत्यू तर एक जखमी झाला. हल्ला वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचा अंदाज असून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर नरेश यादव मंदिरात गेले होते. मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. अज्ञात इसमाने यादव यांच्या ताफ्यावर सात गोळ्या झाडल्या. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कार्यकर्त्याचे नाव अशोक मान असल्याची माहिती ‘आप’चे नेते संजय सिंग यांनी दिली. जखमी कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

























































