
दिल्लीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण पातळी वाढली आहे. वाढत्या प्रदूषणाचा अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यातच १८ डिसेंबरपासून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUCC) नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही, असा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. दिल्लीत PUCC प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले असून, त्याशिवाय पेट्रोल किंवा डिझेल भरता येणार नाही.
दिल्लीचे पर्यावरण मंत्री मंजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितले की, मागील वर्षी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३८० होता, जो आता ३६३ वर आला आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. कचऱ्याचे डोंगर हटवणे, अवैध उद्योगांवर कारवाई, डिझेल जनरेटर बंदी आणि इलेक्ट्रिक बस वाढवणे, असे प्रयत्न सुरू आहेत.
PUCC नसलेल्या वाहनांवर आता ७ लाखांहून अधिक दंड आकारला जाणार आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (DPCC) २ हजारांहून अधिक नोटिसा जारी करून ९ कोटींहून जास्त दंड वसूल केला आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शास्त्रज्ञांची टीमही स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती दिल्ली सरकारने दिली आहे.

























































