शरबत जिहादवरून दिल्ली उच्च न्यायालयाने रामदेव बाबांना खडसावले, डोळ्यांवर व कानांवर विश्वास बसत नाही जाहिरात काढून  टाकण्याचे आदेश 

‘रूह अफजा’ या प्रसिद्ध सरबताशी बाजारात दोन हात करण्याऐवजी त्याची ‘शरबत जिहाद’ अशी संभावना करणाऱया ‘पतंजली’ फेम रामदेव बाबांना मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने चांगलेच खडसावले. तसेच भविष्यात या प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य, जाहिराती किंवा सोशल मींडिया पोस्ट करणार नाही, याची ग्वाही देणारे प्रतिज्ञापत्र पाच दिवसांत सादर करण्याचे आदेश रामदेव बाबांना दिले आहेत.
या प्रसिद्ध सरबताच्या ब्रॅण्डविषयी खोटेनाटे वृत्त पसरविणाऱया रामदेव बाबांची जाहिरात पाहून आम्हाला डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसत नाही, अशा संतापजनक शब्दांत न्या. अमित बन्सल यांनी रामदेव बाबांना फैलावर घेतले. जाहिरातीचे बिलकूल समर्थन करता येणार नाही. यामुळे सदसद्विवेकबुद्धीलाच धक्का बसला आहे, अशी स्पष्टोक्ती न्यायालयाने केली. न्यायालयाच्या या पावित्र्याने रामदेव बाबांनी माफी मागत वादग्रस्त जाहिरात मागे घेण्याचे आश्वासन  दिले.
‘रूह अफजा’ हे ‘हमदर्द’ या प्रसिद्ध पंपनीचे गुलाब सरबत आहे. ‘रूह अफजा’च्या तोडीचे ‘पतंजली’चे सरबत बाजारात आणल्याची जाहिरात रामदेव बाबांनी केली होती. त्याही पुढे जात, तुम्ही ‘रूह अफजा’ पीत असाल तर सावध राहा. कारण यातून मिळणाऱया नफ्यातून मसजिद, मदरसे उभारले जातात, अशी आक्षेपार्ह टिप्पणी बाबानी केली होती.
आपल्या ट्रेडमार्कची बदनामी होत असल्याचे स्पष्ट करत ‘हमदर्द’ने ‘पतंजली’च्या या जाहिरातीला न्यायालयात आव्हान दिले होते. ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी हमदर्दच्या वतीने बाजू मांडली. या प्रकरणी 1 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
आपले मत आपल्या जवळच ठेवा  रामदेव बाबांचे वक्तव्य केवळ बदनामी करणारे नाही तर दोन धार्मिक गटांमध्ये तेढ वाढविणारे आहे. यामुळे समाजात द्वेषभावना पसरवली जात आहे, याकडे अॅड. रोहतगी यांनी लक्ष वेधले. यावर आपली पंपनी कुणा एका धर्माच्या विरोधात नाही. तसेच बाबांचे वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत असून ते मांडण्यापासून त्यांना रोखता येणार नाही, असा बचावाचा पावित्रा पतंजलीच्या वतीने ज्येष्ठ वकील राजीव नय्यर यांनी घेतला. परंतु हा युक्तिवाद अमान्य करत रामदेव बाबांनी आपले मत आपल्याकडेच ठेवावे, जाहीर करू नये, अशी तंबी न्या. बन्सल यांनी दिली.