तबलिगी जमात प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल, मौलाना अद्याप बेपत्ता

1990

दिल्लीतील निजामुद्दीन भागातील मरकज म्हणजेच केंद्रात धार्मिक कार्यक्रम आयोजित करून हजारो लोकांना तिथे गोळा केल्याप्रकरणी या मरकजशी निगडीत 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तबलिगी जमात प्रमुख मौलाना साद यांचेही नाव त्यामध्ये सामील आहे. साद यांच्याव्यतिरिक्त डॉ.जीशान, मुफ्ती शहजाद, मोहम्मद अश्रफ, मुर्सलीन सैफी, युनूस, मोहम्मद सलमान यांचीही नावे प्रथम खबरी अहवालात लिहिण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी एक व्हिडीओ चित्रीत केला होता ज्यामध्ये हे सहा जण स्पष्टपणे दिसत होते.

निजामुद्दीन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश वालिया यांनी मरकज ताबडतोब रिकामे करावे असे निर्देश दिले होते. हे निर्देश दिले जात असताना पोलिसांनी हा व्हिडीओ चित्रीत केला होता. धक्कादायक बाब ही आहे की 28 मार्चपासून मौलाना साद बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी करायला सुरुवात केली आहे. मौलाना सादची जेवढी ठिकाणं आहेत त्या सगळ्या ठिकाणांवर मौलानांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की मौलाना यांनी स्वत:ला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करून घेतलं असावं.

28 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना स्वत: हे मरकज रिकामं करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं होतं. त्यांनी साद यांची भेट घेतली आणि साद यांचं इमारत रिकामी करण्यासाठी मन वळवलं. मरकज रिकामं केल्यानंतर ज्यांना क्वारंटाईन करण्याची गरज होती त्यांना विलग करण्यासाठीही डोवाल यांनी साद यांचं मन वळवलं होतं. हे मरकज रिकामं करण्यासाठी 36 तास ऑपरेशन राबवण्यात आलं. या केंद्रातून तब्बल 2361 लोकांना बाहेर काढण्यात आलं. यातल्या 617 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर इतरांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशभरात सध्या तबलिगी जमातशी निगडीत 2 हजार परदेशी नागरीक आहेत. हे नागरीक 70 विविध देशातून आलेले आहेत. हे सगळेजण हिंदुस्थानात येण्याआधी मलेशियातील क्वालालंपूर इथे धार्मिक कार्यक्रमासाठी जमले होते. तिथे अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. यातले बरेचसे परदेशी नागरीक 2 ते 6 महिन्यांच्या पर्यटन व्हीसावर हिंदुस्थानात आले होते. यामध्ये बांग्लादेश, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलँडच्या नागरिकांचा समावेश आहे. तबलिगी जमातने आयोजित निजामुद्दीन इथल्या मरकज म्हणजेच केंद्रात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी आलेल्यांपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे. इथून कोरोनाची लागण घेऊन अनेक जण विविध राज्यांमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण जाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या