दिल्लीत मुंबईतील 12 इंजिनीअर्स तीन महिन्यांपासून अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
air-india

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील इंजिनीअर्सच्या मदतीला गेलेले मुंबईतील 12 इंजिनीअर्स गेले तीन महिने तिथेच अडकून पडले आहेत. मात्र कंत्राट संपल्यानंतरही त्यांना पुन्हा घरी पाठवायला एअर इंडियाचे व्यवस्थापन टाळाटाळ करत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावर एअर इंडियासाठी काम करणाऱया ‘वाईड बॉडी’ या कंपनीच्या इंजिनीअर्सला मदत म्हणून मुंबईतून एअर इंडियाची अंतर्गत कंपनी असलेल्या एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लि. (AIESL) मधील 12 इंजिनीअर्स दिल्लीला गेले होते.

या इंजिनीअर्सनी पाहणी करून परवानगी दिल्याशिवाय विमान उड्डाण करू शकत नाही. मात्र आता तीन महिने होऊन गेले तरी या इंजिनीअर्सला मुंबईत परत पाठवायला ही कंपनी तयार नाही. या कंपनीच्या व्यवस्थापनमधील अंतर्गत भांडणांचा फटका या इंजिनीअर्सला बसत असून आम्हाला घरी पाठवा, अशी मागणी आता या इंजिनीअर्सकडून केली जात आहे. त्याचबरोबर या इंजिनीअर्सला आणि त्याआधी दिल्लीत गेलेल्या इंजिनीअर्सला गेले तीन महिने एक पैसाही भत्ता दिलेला नाही. कोरोनामुळे दिल्ली येथून पूर्वी होणाऱया उड्डाणाच्या फक्त 30 टक्के उड्डाणे आता होत आहेत. अशा परिस्थितीत आम्हाला मुद्दाम त्रास देण्यासाठी येथे थांबवून ठेवले जात आहे, असा आरोप या इंजिनीअर्सनी केला आहे. त्यात एअर इंडियामध्ये गेले काही महिने 40 टक्के वेतन कपात करण्यात आली आहे.

कंपनीची उडवाउडवीची उत्तरे

केवळ तीन महिन्यांसाठी बोलावून आता इथे एक वर्षे राहा, अशी सक्ती कंपनीच्या व्यवस्थापनाकडून केली जात आहे, असा आरोप या इंजिनीअर्सने केला आहे. दरम्यान, कंपनीचे सीईओ एअर इंडिया वन हे नवीन विमान आणायला अमेरिकेस गेले आहेत. ते 29 ऑगस्टला आल्यानंतर निर्णय घेऊ, अशी उडवाउडवीची उत्तरे कंपनीकडून दिली जात आहेत.